मुळशी धरणाचे पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला देण्याबाबत चर्चा झाल्यानंतर पाण्यावरून नवा वाद पेटला आहे. मुळशीकरांना त्यांचे हक्काचे पाणी मिळेपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवडला एक थेंबही पाणी देणार नाही, असा इशारा पुणे जिल्हा माजी नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी दिला आहे.
22 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुळशी धरणाचे पाणी पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहराला देण्याबाबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली, असे कंधारे यांनी सांगितले.
564 कोटींची योजना चार वर्षांपासून रखडली
मुळशी धरणातील पाणी आमच्या हक्काचे आहे, असे कंधारे म्हणाले. आमच्या तालुक्यात मुळशी धरण असताना आमची 564 कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना मागील चार वर्षांपासून धुळ खात पडली आहे. फक्त पिण्याच्या पाण्याची परवानगी नसल्याने ही योजना रखडली आहे, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र शासन शहरी भागाचा ग्रामीण भागापेक्षा जास्त विचार करते की काय, असा प्रश्न पडला आहे, असेही कंधारे म्हणाले. आम्ही मुळशीच्या पाण्यासाठी वारंवार आंदोलने केली आहेत, रस्त्यावर उतरलो आहे. येणाऱ्या काळात मुळशीचे पाणी आम्हाला न देता या दोन शहरांना मिळणार असेल तर आम्ही त्या निर्णयाच्या विरोधात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
पुण्यात पाणी वाया, नागरिकांवर कपात
दुसरीकडे, पुणे शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून नागरिकांवर पाणी कपातीचा भार टाकला जात असताना महापालिकेच्या फुटलेल्या जलवाहिन्यांमधून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून, पुणेकरांच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन किती गंभीर आहे, असा सवाल शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी उपस्थित केला आहे.
Leave a Reply