एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील सामन्याच्या टॉसवेळी अनपेक्षित गोंधळ पाहायला मिळाला. दोहा येथील वेस्ट एंड पार्क स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याची सुरुवातच वादग्रस्त ठरली.
पाकिस्तान अ संघाचा कर्णधार अब्दुल समद याने टॉससाठी हेड्सची निवड केली होती. नाणेफेक झाल्यानंतर सामना रेफ्री नियामुर रशीद यांनी टेल्स आल्याचे जाहीर करत भारत अ संघाने टॉस जिंकल्याचे सांगितले. मात्र या निर्णयावर समद समाधानी नव्हता.
नाणे तपासल्यानंतर निर्णय बदलला
रेफ्रींच्या निर्णयानंतर समद आणि भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा यांनी नाणे स्वतः तपासले. त्यावेळी समदने माइकवरून हे हेड्स आहे, हे हेड्स आहे असे स्पष्टपणे सांगितले. नाणे तपासल्यानंतर रेफ्रींनी आपला निर्णय बदलला आणि पाकिस्तान अ संघाने टॉस जिंकल्याचे जाहीर केले.
अखेर पाकिस्तान अ संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिलक वर्मा यानेही टॉस जिंकला असता तर प्रथम फलंदाजीच केली असती, असे सांगितले. दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.
टॉसवेळी हस्तांदोलन नाही
टॉसदरम्यान तिलक वर्मा आणि अब्दुल समद यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांमधील नो हँडशेकची भूमिका या सामन्यातही कायम राहिली. टॉसचा हा गोंधळ सामन्याच्या सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला.
Leave a Reply