जगात अशी काही ठिकाणं आहेत, जिथे निसर्गाचे चमत्कार पाहायला मिळतात. कुठे मध्यरात्रीही सूर्यप्रकाश असतो, तर कुठे अनेक दिवस सूर्य उगवतच नाही. अमेरिकेतील अलास्का राज्यातील ‘उतकियाग्विक’ (Utqiagvik) हे शहर सध्या अशाच एका नैसर्गिक घटनेमुळे चर्चेत आहे. या शहरातील नागरिकांना आता तब्बल ६५ दिवस सूर्योदय पाहता येणार नाही. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी इथला सूर्यास्त झाला असून आता थेट २३ जानेवारी २०२७ रोजी सूर्य पुन्हा आकाशात दिसणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांहून अधिक काळ हे शहर सूर्यप्रकाशाशिवाय राहणार आहे.
कुठे आहे हे उतकियाग्विक शहर?
उतकियाग्विक हे अमेरिकेतल्या अलास्का राज्याच्या उत्तरेकडील टोकाला वसलेलं शहर आहे. हे अमेरिकेतील सर्वात उत्तरेकडील शहर म्हणून ओळखलं जातं. याचं पूर्वीचं नाव बॅरो (Barrow) असं होतं. आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेला असल्यामुळे इथं हिवाळ्यात दिवसाचा कालावधी प्रचंड कमी होतो. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत येथे सूर्य काही तासांसाठीच दिसतो. त्यानंतर अशी वेळ येते की सूर्य क्षितिजाच्या वर येतच नाही. याच नैसर्गिक घटनेला ‘पोलर नाईट’ (Polar Night) असं म्हणतात.
नेमका कधी उगवणार सूर्य?
उतकियाग्विकमध्ये १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साधारण १ वाजून ४२ मिनिटांनी वर्षातील शेवटचा सूर्यास्त झाला. त्यानंतर १९ नोव्हेंबरपासून इथं पोलर नाईटला सुरुवात झाली. आता २२ जानेवारी २०२७ पर्यंत सूर्य क्षितिजाच्या वर येणार नाही. त्यानंतर २३ जानेवारी २०२७ रोजी दुपारी साधारण १ वाजून ३ मिनिटांनी सूर्य पुन्हा उगवेल. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी सूर्य केवळ एक तास १३ मिनिटांसाठीच दिसणार आहे.
काय आहे पोलर नाईटमागचं विज्ञान?
पृथ्वीचा अक्ष सुमारे २३.५ अंशांनी कललेला आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना उत्तर गोलार्ध हिवाळ्यात सूर्यापासून दूर झुकलेला असतो. त्यामुळे आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेकडील भागात सूर्याची किरणं थेट पोहोचत नाहीत. यामुळे काही ठिकाणी सलग अनेक दिवस सूर्य क्षितिजाच्या वर येत नाही. मात्र, याचा अर्थ संपूर्ण दिवस पूर्ण काळोख असतो असं नाही. दुपारच्या सुमारास आकाशात काही तास मंद प्रकाश दिसतो. याला सिव्हिल ट्वायलाइट (Civil Twilight) म्हणतात. डिसेंबरमधील सर्वात लहान दिवसातही उतकियाग्विकमध्ये साधारण तीन तास असा प्रकाश असतो.
उन्हाळ्यात अगदी उलट चित्र
हिवाळ्यात ६५ दिवस सूर्यदर्शन न होणाऱ्या या शहरात उन्हाळ्यात मात्र सूर्य मावळतच नाही. मे महिन्यापासून ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत इथं मध्यरात्रीही सूर्यप्रकाश पाहायला मिळतो. या घटनेला ‘मिडनाइट सन’ (Midnight Sun) म्हणतात. त्यामुळे एकाच शहरात वर्षाच्या वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दिवस आणि रात्रीचं असं टोकाचं रूप पाहायला मिळतं.
Leave a Reply