ओटीटीवर दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट आणि वेब मालिका प्रदर्शित होत असतात. मात्र काही चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक हॉरर थ्रिलर चित्रपट चर्चेत आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच ट्रेंडिंगच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘४१८’.
४१८ क्रमांकाच्या खोलीची कथा
एका शापित हॉस्टेलची रहस्यमयी कथा या चित्रपटात पाहायला मिळते. ‘४१८’ हा मूळचा तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा कर्नाटकातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील ४१८ क्रमांकाच्या खोलीभोवती फिरते. या खोलीशी संबंधित अनेक रहस्यमयी आणि भयावह घटना घडत असतात. ही खोली शापित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या खोलीत जाणाऱ्या व्यक्तींना कोणत्या विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते, हे चित्रपटात पाहायला मिळते. हॉस्टेल, तिथले वातावरण आणि एका खोलीशी जोडलेले गूढ अशा पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा पुढे सरकते.
प्रेक्षकांची पसंती आणि मानांकन
या चित्रपटात केवळ भीतीदायक प्रसंगच नाहीत, तर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे रहस्यही आहे. एकट्याने हा चित्रपट पाहणे काही प्रेक्षकांसाठी धाडसाचे ठरू शकते. ‘केजीएफ’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटाला सादर केले आहे, तर दिग्दर्शक कीर्तन नाडागौडा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मैत्री मूव्ही मेकर्स या निर्मिती संस्थेचा हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. चित्रपटगृहांत प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेला हा चित्रपट २० नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर आला. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा चित्रपट पाहता येतो. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ८.५ गुण मिळाले आहेत.
Leave a Reply