रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी भारत अ आणि पाकिस्तान अ हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. दोन्ही संघांनी स्पर्धेची सुरुवात विजयाने केली असून, दुसऱ्या सामन्यात बाजी मारण्यासाठी दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
सामना कधी आणि कुठे होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना रविवारी कतारची राजधानी दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील ग्रुप बी मधील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. दोहाच्या स्थानिक वेळेनुसार सामना दुपारी एक वाजता सुरू होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर नाणेफेक दुपारी तीन वाजता होणार आहे.
दोन्ही संघांचा फॉर्म
पहिल्या सामन्यात भारत संघाने नेपाळचा तब्बल ३०६ धावांनी पराभव केला. दुसरीकडे, पाकिस्तान संघाने संयुक्त अरब अमिरातीचा ६१ धावांनी पराभव केला. त्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. ग्रुप बी मधील गुणतालिकेत पहिल्या विजयानंतर भारत अव्वल, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना उर्वरित दोन सामन्यांपैकी आणखी एका विजयाची गरज आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाचा सामना यूएईशी होणार आहे, तर पाकिस्तानचा पुढील सामना नेपाळशी होईल. सध्याचा फॉर्म पाहता दोन्ही संघ उपांत्य फेरीत धडक मारण्याची शक्यता आहे.
थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहता येईल. हिंदी आणि इंग्रजी भाषेत समालोचनाचा पर्याय उपलब्ध असेल. मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पाहू इच्छिणाऱ्या चाहत्यांना सोनीलिव्ह ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
दोन्ही संघ
भारत अ संघ: तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, रिंकू सिंग, कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग, शाहबाज अहमद, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, हर्षित राणा, प्रिन्स कोष यादव, अरश खान, तनेश यादव.
पाकिस्तान अ संघ: अब्दुल समद (कर्णधार), शाहजेब खान, हैदर अली, हसन नवाज, माझ सदाकत, रोहेल नझीर (यष्टीरक्षक), दानिश अझीझ, मोहम्मद इम्रान रंधावा, मोहम्मद हसनैन, अहमद दानियाल, सुफियान मुकीम, अली रझा, साद मसूद, शमील हुसैन, फरहान यूसुफ.
Leave a Reply