इराकच्या दक्षिणेकडील बसरा प्रांतातील एका महत्त्वाच्या वीज केंद्राला २१ नोव्हेंबर रोजी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. बसरा शहराच्या उत्तरेला सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या अल-हार्था वीज केंद्रात ही दुर्घटना घडली. आगीचे लोळ इतके उंच उसळले की त्यांनी वीज केंद्राच्या शेजारी असलेल्या निवासी वस्त्यांनाही आपल्या कवेत घेतले.
गॅस पाइपलाइनच्या स्फोटानंतर आग
प्राथमिक माहितीनुसार, वीज केंद्राला गॅस पुरवठा करणाऱ्या मुख्य पाइपलाइनमध्ये अचानक स्फोट झाल्यानंतर या आगीला सुरुवात झाली. स्फोट होताच आग वीज केंद्राच्या परिसरात वेगाने पसरली आणि तिचे लोळ जवळच्या घरांपर्यंत पोहोचले. या आगीत अनेक घरांचे आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. जखमी झालेल्या ३० जणांना रुग्णवाहिकांमधून जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
८०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बंद
इराकच्या ऊर्जा क्षेत्रासाठी अल-हार्था वीज केंद्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती क्षमता सुमारे ८०० मेगावॅट इतकी आहे. अपघात घडला त्या वेळी या केंद्रातून सुमारे ४०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू होती. मात्र, आगीच्या धोक्यामुळे आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव संपूर्ण वीज प्रकल्प तात्पुरता बंद करावा लागला आहे. त्यामुळे बसरा आणि आसपासच्या भागातील वीजपुरवठ्यावर थेट परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सध्या इराकी सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित विभागांचे अधिकारी या स्फोटाच्या आणि आगीच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत. सरकारकडून नुकसानीचा संपूर्ण आणि अंतिम तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. गॅस पाइपलाइनमध्ये स्फोट तांत्रिक बिघाडामुळे झाला की देखभालीतील त्रुटींमुळे, याचा शोध तपास पथक घेत आहे.
Leave a Reply