छत्रपती संभाजीनगर शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी महापालिकेने कंत्राटदार कंपनीला मजुरांची संख्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीपूर्वी अंतर्गत पाइपलाइनच्या कामावर ३५० मजूर कार्यरत होते. मात्र, सुटीनंतर केवळ १५० मजूर कामावर परतले आहेत.
ही संख्या २५ नोव्हेंबरपर्यंत ३५० पर्यंत नेऊन त्यात आणखी १५० मजुरांची भर घालत एकूण ५०० मजूर तैनात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उन्हाळ्यापूर्वी पाणीपुरवठ्यापासून वंचित असलेल्या भागांतील नागरिकांना पाणी देण्यासाठी गॅप क्लोजिंग आणि नळजोडणीची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात
शहरातील १९०० किलोमीटर अंतर्गत पाइपलाइनपैकी आतापर्यंत १३०० किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात आली आहे. दूषित पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आणखी १०० किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिवाळीच्या सुटीमुळे मजूर गावी गेल्याने कामाचा वेग मंदावला होता. आता मजुरांची संख्या वाढवून कामाला गती दिली जाणार आहे.
चार टाक्यांमध्ये पाणी; नळजोडणीसाठी मालमत्ता कर बंधनकारक
सातारा-देवळाई परिसरातील चार टाक्यांमध्ये पाणी घेण्यात आले आहे. या टाक्यांशी संबंधित पाइपलाइनमधील गॅप जोडण्याचे काम सुरू असून, प्रत्येक पाइपलाइनची तपासणी केली जात आहे. ही कामे आव्हानात्मक असल्याने आणखी दीड महिना लागण्याचा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. टाकीनिहाय गॅप क्लोजिंग पूर्ण करून संबंधित भागात पाणीपुरवठा कधी सुरू करता येईल, याचे नियोजन केले जात आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेतून नळजोडणी देण्यासाठी महापालिकेने अर्ज मागवले आहेत. आतापर्यंत सुमारे सात हजार अर्ज प्राप्त झाले असून, त्यांचे झोननिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे. अर्जासाठी मालमत्ता कर भरणे बंधनकारक आहे. ज्यांच्या मालमत्तेवर अद्याप कर आकारणी झालेली नाही, त्यांनी आधी कर आकारणी करून घेणे आवश्यक आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून, चालू आर्थिक वर्षात २० नोव्हेंबरपर्यंत ९५ हजार ३४० मालमताधारकांनी कर भरला आहे. यातून महापालिकेच्या तिजोरीत ९८ कोटी ३० लाख रुपये जमा झाले आहेत. थकबाकीदारांसाठी लागू केलेल्या १०० टक्के शास्ती माफी योजनेचा नागरिक लाभ घेत आहेत. आतापर्यंत ३ हजार ८५ थकबाकीदारांनी या योजनेतून ४ कोटी ८६ लाख रुपयांचा कर भरला आहे. महापालिका विभागाकडे ३ लाख २७ हजार ४३ मालमत्तांची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील सुमारे ५.५० लाख मालमत्ता असल्याचे कचरा संकलन करणाऱ्या खासगी कंपनीच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. नोंद असलेल्या मालमत्तांपैकी केवळ १ लाख ४० हजार मालमत्ताधारक नियमित कर भरतात.
Leave a Reply