छत्रपती संभाजीनगर परिमंडलात कायमस्वरूपी तसेच तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च दाब व लघुदाब ग्राहकांसाठी महावितरणतर्फे ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ परिमंडलातील तब्बल ३ लाख ६५ हजार १५७ थकबाकीदार ग्राहकांना घेता येणार आहे. पात्र ग्राहकांनी योजनेतील विविध सवलतींचा लाभ घेऊन थकबाकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अभय योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
पात्र ग्राहकांकडे सुमारे ६४४ कोटी रुपयांची थकबाकी
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित असलेल्या पात्र ग्राहकांकडे सुमारे ६४४ कोटी ८६ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना सुमारे २०५ कोटी ५६ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे. याशिवाय, १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीच्या एकरकमी भरण्यावर १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. अभय योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि ऑनलाइन आहे. ग्राहकांना महावितरणच्या अधिकृत पोर्टलवरून किंवा मोबाईल अॅपद्वारे योजनेसाठी अर्ज करता येईल.
शहर मंडलातील ५८ हजार ३८४ ग्राहकांकडे २१६ कोटी ६ लाख रुपये मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना ८६ कोटी ६० लाख रुपये विलंब आकार व व्याज माफ होणार आहे. ग्रामीण मंडलातील १ लाख ३३ हजार ५७५ ग्राहकांकडे १४९ कोटी ६८ लाख रुपयांची मूळ थकबाकी असून, त्यांना २६ कोटी ८१ लाख रुपये व्याज व विलंब आकारातून शंभर टक्के सवलत मिळणार आहे. तर जालना मंडलातील १ लाख ७३ हजार १९८ ग्राहकांकडे २७९ कोटी १२ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना ९२ कोटी १४ लाख रुपये व्याज व विलंब आकार माफ होणार आहे.
पुनर्जोडणी शुल्क, सर्व्हिस कनेक्शन शुल्क माफ
या योजनेअंतर्गत ग्राहकांच्या एकूण थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार शंभर टक्के माफ करण्यात येणार आहे. याशिवाय, उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यामध्ये आणखी १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच थकबाकी हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लघुदाब ग्राहकांना ५० टक्के डाउन पेमेंट भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल, तर उच्चदाब ग्राहकांसाठी तीन ते सहा हप्त्यांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, २० किलोवॉटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी वीजपुरवठा पुनर्जोडणीच्या वेळी प्रीपेड मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. अशा ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्क आणि सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी या संधीचा लाभ घेऊन व्याज व विलंब आकाराच्या मोठ्या आर्थिक सवलतीचा फायदा घ्यावा आणि थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.
Leave a Reply