रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

लाईक्सच्या नादात मुलांचे फोटो ऑनलाइन टाकणे धोक्याचे

लाईक्स-व्ह्यूजसाठी पालक मुलांचे फोटो शेअर करतात; पण त्यामुळे मुलांच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो. गैरवापर टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.

लाईक्सच्या नादात मुलांचे फोटो ऑनलाइन टाकणे धोक्याचे

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो, व्हिडीओ आणि दैनंदिन आयुष्यातील क्षण शेअर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः पालक आपल्या मुलांचे गोंडस फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात अनेकजण आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टीही ऑनलाइन मांडतात. मात्र, मुलांचे फोटो शेअर करणे कितपत सुरक्षित आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे.

फोटो शेअर केल्याने कोणते धोके?

मुलांचे बालपण ही अशी स्थिती असते, जेव्हा मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वाढत असतात. अशा वेळी त्यांचे फोटो किंवा रील शेअर केल्याने त्यांच्या गोपनीयतेपासून ते त्यांच्या वागण्यापर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. इंटरनेटवर एकदा काही पोस्ट केले की ते काढून टाकणे खूप कठीण होते. लोक ऑनलाइन शेअर केलेल्या गोष्टींचे स्क्रीनशॉट घेतात. त्यामुळे लहान मुलाचा फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना ते मूल मोठं झाल्यावर त्याच्यावर किती परिणाम होऊ शकतो, याचा नक्कीच विचार करावा.

मुलांचे फोटो चुकीच्या ठिकाणी व्हायरल होण्याचाही धोका असतो. काही वेळा मुलाचे फोटो आणि व्हिडीओ दुसऱ्या नावाने आणि ओळखीसह वापरले जातात; यालाच ऑनलाइन किडनॅपिंग असे म्हटले जाते. अनेक वेळा काही लोक ऑनलाइन इतर लोकांच्या मुलांना स्वतःचे म्हणून दावा करतात. फोटो पाहून मुलांना चिडवले जाते, नकारात्मक कमेंट्स केल्या जातात आणि त्यांना सायबर बुलिंगचा सामना करावा लागतो.

काही लोक चुकीच्या मार्गाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंचा फायदा घेतात. लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओ एडिट करून आक्षेपार्ह वेबसाईट्स किंवा फोरमवर पोस्ट केले जातात. त्यामुळे मुलांचे फोटो शेअर करताना पालकांनी सावध राहणे आवश्यक आहे.

शेअर करताना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मुलांचे किंवा तुमचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर शेअर करताना सावधगिरी बाळगा. अकाउंटची प्रायव्हसी सेटिंग तपासा, फोटो केवळ विश्वासू व्यक्तींपर्यंत मर्यादित ठेवा आणि मुलांचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, घराचा पत्ता किंवा नियमित ठिकाणांची माहिती शेअर करू नका. मुलांचे आंघोळ करतानाचे किंवा अतिवैयक्तिक क्षणांतील फोटो पोस्ट करणे टाळा. ऑनलाइन धमक्या पाहता मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना नेहमी सतर्क राहा आणि तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करा.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance