आज जगभरात वर्ल्ड टेलिव्हिजन डे साजरा केला जात असताना टीव्ही विश्वातील एका नव्या मालिकेचा लॉन्चिंग सोहळा पार पडला. एकता कपूर निर्मित दिल की बेवफाइयां या नव्या मालिकेच्या लॉन्चिंग प्रसंगी बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान हिने विशेष हजेरी लावली होती. गौरव खन्ना आणि श्रद्धा आर्या यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका येत्या २४ नोव्हेंबरपासून स्टार प्लस वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
बालपणीच्या आठवणींना उजाळा
या खास संवादादरम्यान फराह खानने बालपणीच्या दिवसांची आठवण सांगत आपल्या मिश्किल आणि बिनधास्त शैलीत जुने किस्से शेअर केले. यावेळी गौरव आणि श्रद्धासोबत गप्पा मारताना फराहने दूरदर्शनवरील गाजलेल्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ती हसत म्हणाली की, लहानपणी आम्ही टीव्हीवर आवर्जून आमची माती आमची माणसं बघायचो. तिच्या या खास आणि मराठी मातीशी जोडलेल्या आठवणीने उपस्थितांची मनं जिंकली आणि कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली.
मानव आणि जानकीची भावनिक गोष्ट
नातेसंबंधांतील गुंतागुंत, भावना आणि त्यातून घेतले जाणारे निर्णय यावर भाष्य करणाऱ्या मालिका देण्यासाठी एकता कपूर ओळखली जाते. याच परंपरेत भर घालणाऱ्या या मालिकेत गौरव खन्ना मानवच्या तर श्रद्धा आर्या जानकीच्या भूमिकेत दिसणार आहे. मानव आणि जानकीची ही भावनिक आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली गोष्ट अनुभवण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक आहेत. दिल की बेवफाइयां ही मालिका येत्या २४ नोव्हेंबरपासून फक्त स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.
Leave a Reply