नाशिक महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड एकीकडे होत असताना दुसरीकडे भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा पक्षाने राजीनामा घेतल्याचे वृत्त असून, केदार यांचा मात्र संपर्क होऊ शकलेला नाही. राजीनाम्यामागे स्वीकृत सदस्यांसाठी नावे निश्चित करण्याचे कारण दाखवले जात असले तरी, यामागे पक्षांतर्गत राजकारणातून केदार यांचा राजीनामा घेतला गेल्याची चर्चा होऊ लागली आहे.
साडेपाचशे नावांमधून निवड कशी झाली
स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपाकडून जवळपास साडेपाचशे नावे पक्षाकडे आली होती. त्यातील काही नावांची छाननी करून कोअर कमिटीने काही नावांची शिफारस केली होती. त्यामुळे त्यांच्याविषयी थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र स्वीकृतसाठी काही इच्छुकांनी थेट मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे फिल्डिंग लावली होती. नावावर एकमत होत नसल्याने पक्षाने स्वीकृतची निवड पुढे ढकलण्याची खेळी खेळली. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर भाजपाच्या काही इच्छुकांची नावे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
प्रदेशाध्यक्षांशी मतभेद आणि राजीनामा
व्हायरल झालेल्या नावांमध्ये सुनील केदार यांचेही नाव होते. मात्र पक्षाने ते नंतर फेटाळले. दरम्यान, स्वीकृतसाठी सहा नावे निश्चित झाल्यानंतर पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीष महाजन यांनी हिरवा कंदील दर्शवला असला तरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना या साऱ्या निवडीत अंधारात ठेवण्यात आले. त्यावरून संतप्त झालेल्या चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात शहराध्यक्ष सुनील केदार यांना मुंबईत पाचारण करून जाब विचारला आणि त्यांनी चूक कबूल केल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र त्याची जाहीर वाच्यता वा चर्चा गोपनीय ठेवण्यात आली.
शुक्रवारी महासभेत स्वीकृतच्या सदस्यांची निवड जाहीर झाल्यानंतर केदार यांच्या राजीनाम्याची चर्चा पसरली. या संदर्भात केदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे या संदर्भातील चर्चेला पुष्टी मिळू लागली आहे. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे.
Leave a Reply