अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात भारताच्या वाढत्या ताकदीकडे चीन कसा पाहतो, याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. भारताची लष्करी, आर्थिक आणि जागतिक पातळीवरील ताकद चीनच्या भविष्यातील सत्तास्पर्धेवर परिणाम करू शकते, असे या अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेच्या यूएस-चायना इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशनने १८ नोव्हेंबर रोजी २०२६ चा अहवाल काँग्रेससमोर सादर केला. या अहवालात भारताचा उल्लेख जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, सर्वात मोठी लोकशाही आणि अण्वस्त्रधारी देश असा करण्यात आला आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठ्या सैन्यदलांपैकी एक सैन्यदल असून चीनसोबतची २,१०० मैलांची वादग्रस्त सीमा आहे.
पाकिस्तानला मदत करून भारतावर दबाव
चीन आणि पाकिस्तानमधील वाढती लष्करी भागीदारी भारतासाठी दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका वाढवणारी ठरू शकते, असे अहवालात नमूद आहे. मे २०२५ मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनने थेट युद्धात उतरण्याऐवजी पाकिस्तानला मदत करण्याची रणनीती अवलंबली. पाकिस्तानला चीनमध्ये बनवलेली आधुनिक शस्त्रास्त्रे मिळाली होती. तसेच चिनी तज्ज्ञ पाकिस्तानमध्ये राहून तांत्रिक मदत करत असल्याचाही उल्लेख अहवालात आहे.
भारताला रोखण्याचे प्रयत्न
भारताची ताकद लक्षात घेऊन चीन लष्करी, आर्थिक आणि सागरी क्षेत्रात दबाव निर्माण करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारताला आवश्यक असलेल्या काही औद्योगिक वस्तू, तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या पुरवठ्यावरही चीनने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे भारताचा वाढता प्रभाव रोखण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे अमेरिकी आयोगाने नमूद केले आहे.
अहवालात २०२० मधील गलवान खोऱ्यातील संघर्षाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेनंतर भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. २०२४ पासून दोन्ही देशांनी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले असले, तरी चीनच्या पाकिस्तानसोबतच्या वाढत्या लष्करी सहकार्यामुळे भारताची चिंता कायम असल्याचे अहवालातून स्पष्ट होते. चीनने भारताला केवळ सीमेवरच नव्हे, तर आर्थिक आणि सामरिक पातळीवरही आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे अमेरिकी आयोगाने अधोरेखित केले आहे.
Leave a Reply