पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. या टीकेला भाजपच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
हेमा मालिनी काय म्हणाल्या?
हेमा मालिनी म्हणाल्या की, राहुल गांधी सातत्याने देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना देशाची परिस्थिती वाईट असल्याचं वाटतं, मात्र प्रत्यक्षात देशाची स्थिती चांगली आहे आणि ही गोष्ट जनतेलाही ठाऊक आहे, असं त्यांनी नमूद केलं. राहुल गांधी मोदी सरकारला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते नेहमीच अशी वक्तव्यं करणार, हे सगळ्यांना माहीत आहे, असंही त्या म्हणाल्या.
वादाची पार्श्वभूमी काय?
गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी फिक्कीच्या कार्यक्रमात उद्योग क्षेत्राशी निगडित मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. सरकारने कॉर्पोरेट कर ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत कमी केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच १२ लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त केल्याचाही उल्लेख त्यांनी केला. मात्र या सवलतींचा फायदा कर्मचाऱ्यांना कितपत झाला, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलं की, सरकारने कंपन्यांना करात सवलत दिली, पण त्याबदल्यात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का? रोजगाराच्या संधी वाढवल्या का? नोटाबंदी आणि जीएसटीमुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त झाले असून, मक्तेदारीमुळे रोजगार निर्माण होत नाहीत; उलट वस्तूंच्या किमती वाढतात आणि स्पर्धा संपुष्टात येते, असंही त्यांनी म्हटलं. सरकारच्या समर्थकांनी स्वतःचं कौतुक करून घेण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी उद्योगपतींना स्वदेशीचं महत्त्व आठवलं होतं. महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा संदेश दिला होता. मात्र शंभर वर्षांनंतरही उद्योग क्षेत्राला स्वदेशीचं महत्त्व समजावून सांगावं लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. माझं ऐकलं नाही तरी चालेल, पण किमान महात्मा गांधी यांचा संदेश तरी लक्षात घ्या, असं आवाहन त्यांनी केलं होतं.
Leave a Reply