सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत भाजपला दोन्ही पदांपासून दूर राहावे लागल्यानंतर मित्रपक्षांमधील नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. आधी मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका मांडली होती. आता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही यावर भाष्य करत घडलेल्या घटनांचा खुलासा केला आहे.
शिवेंद्रराजे यांनी सांगितले की, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या सूचना आणि सुचवलेली नावे आपण वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत पोहोचवली होती. मात्र चर्चा होऊनही संबंधित मित्रपक्षांनी ‘आमचा निर्णय आता झाला आहे’ असे सांगत वेगळा निर्णय घेतला, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊनही स्थानिक पातळीवर वेगळेच राजकीय गणित जुळल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.
मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळण्यासाठी माघार घेतली
या घडामोडींवर बोलताना शिवेंद्रराजे यांनी आपण युती टिकवण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द पाळण्यासाठी आणि महायुतीमध्ये समन्वय राहावा यासाठी आपण माघार घेतली, असे त्यांनी म्हटले. आपल्याकडे पुरेसे मतदान असतानाही कार्यकर्त्यांची समजूत काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतकेच नाही, तर भाजपच्या उमेदवारांविरोधात पक्षांतर्गत कुरघोड्या करण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकाराचा मतदानात काहीसा फटका बसल्याचे सांगत त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला.
जयकुमार गोरेंनी शंभूराज देसाईंना सुनावले
दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली होती. भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढला असता तर सत्तेत आला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला हवेत, असेही ते म्हणाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेचे अधिकार शिवेंद्रराजे यांच्याकडेच होते आणि नेमकी काय चर्चा झाली, याची आपल्याला माहिती नसल्याचेही गोरेंनी स्पष्ट केले होते. आता शिवेंद्रराजेंच्या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या सूचना, स्थानिक पातळीवरील निर्णय आणि भाजपमधील कथित अंतर्गत मतभेद यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Leave a Reply