पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिला पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीवेळी एखाद्या तरुणीला मासिक पाळी आली, तर तिला चार ते पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
अनेक तरुणी वर्षानुवर्षे अथक मेहनत घेऊन पोलीस भरतीची तयारी करतात. मात्र शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास पोटात कळा, कंबरदुखी किंवा अशक्तपणा येऊ शकतो आणि त्याचा परिणाम धावण्याच्या गतीवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ त्या दिवसाच्या शारीरिक अडचणीमुळे उमेदवारीची संधी हुकण्याची भीती असते. हीच अडचण लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आरोग्य तपासणीनंतर चाचणीची संधी
शारीरिक चाचणीवेळी मासिक पाळी आल्यास आरोग्य तपासणीनंतर उमेदवाराला पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. त्यानंतर ती चाचणी देऊ शकेल. प्रत्येक स्त्रीला कमी-अधिक प्रमाणात मासिक पाळीचा त्रास होत असतो, पण त्याचा परिणाम भरतीच्या संधीवर होऊ नये, हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
पोलीस भरतीसाठी महिला उमेदवार अनेक महिने सराव करतात. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुणी दररोज धावणे, व्यायाम आणि अन्य शारीरिक सराव करून तयारी करतात. चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास त्यांना पोटदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा किंवा अन्य शारीरिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो आणि त्याचा परिणाम शारीरिक कामगिरीवर होण्याची शक्यता असते.
मिशन खाकी अंतर्गत उमेदवारांच्या भेटी
सध्या योगेश कदम यांचे मिशन खाकी सुरू असून या अंतर्गत ते पोलीस भरती आणि अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींची भेट घेत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन शासनामार्फत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुलांना सरावासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही त्यांनी केले आहेत. त्याचबरोबर आता पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणींसाठी हा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
Leave a Reply