उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई सावित्री देवी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉकमधील पंचूर या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९१ वर्षांच्या होत्या. योगी आदित्यनाथ यांच्या आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या आणि वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. मुख्यमंत्र्यांच्या भावाने आईच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सावित्री देवी यांच्या निधनाने पंचूर गावात आणि संपूर्ण परिसरात धक्का बसला आहे.
पंचूर गावात अखेरचा श्वास
मिळालेल्या माहितीनुसार, सावित्री देवी यांचे शुक्रवारी सकाळी ११ वाजता यमकेश्वर येथील पंचूरमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या आपल्या धाकट्या मुलासोबत गावात राहत होत्या. सावित्री देवी यांचे पार्थिव शनिवारी हरिद्वारला आणले जाईल आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील हरिद्वारला रवाना होण्याची शक्यता आहे. सावित्री देवी यांचे वय ९१ वर्षे होते आणि वाढत्या वयामुळे त्या सतत आजारी पडत होत्या. १४ मे २०२४ रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना ऋषिकेश येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती.
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मूळचे उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉकमधील पंचूर गावचे रहिवासी आहेत आणि त्यांचे कुटुंब आजही त्याच गावात राहते. योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांचे २०२० मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर जवळपास सहा वर्षांनी त्यांच्या आई सावित्री देवी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे योगी आदित्यनाथ यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a Reply