अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात त्यांनी सातत्याने विविध आरोप केले असून, आता त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून थेट सरकारलाच आव्हान दिले आहे.
आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, अपघातात दोषी असलेल्या व्हीएसआर कंपनीला क्लिनचिट देण्याची घाई सुरू आहे. ट्रोलर्सपासून ते अनेक आमदार-मंत्र्यांपर्यंत सगळेच एकाच सुरात या कंपनीची पाठराखण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कंपनीसाठी केला जाणारा आटापिटा अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी केला असता, तर महाराष्ट्राला अभिमान वाटला असता, असेही त्यांनी म्हटले आहे.
फडणवीसांवर आरोप, पत्रकार परिषदेत फोटो दाखवला
यापूर्वी रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस हे व्हीएसआर कंपनीला वाचवत असल्याचा आरोप केला होता. भर पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीस यांचा एक फोटोही दाखवला होता. या आरोपांनंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र रंगले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी ही पक्षाची भूमिका नसून रोहित पवार यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते.
नार्को टेस्टचे आव्हान
रोहित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, कंपनीची वकिली करणाऱ्या एका मंत्र्याने त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर त्यांनी सरकारला थेट आव्हान देत म्हटले की, वेळ दवडू नका, आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा. मात्र, त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे — त्यांच्यासोबत ‘त्यांची’ देखील नार्को टेस्ट करा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.
मी कधीही तयार आहे, पण सत्य समोर येण्याच्या भीतीने ‘ते’ या अग्निपरीक्षेला तयार होतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Leave a Reply