उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा येथे आयोजित श्रीराम कथेच्या मंडपात गेल्या काही दिवसांपासून एकाच व्यक्तीची चर्चा रंगली आहे. कथेचे आयोजन राजा भैय्या यांनी केले असून, कथा ऐकण्यासाठी आलेल्या एका भाविकाने अंगावर तब्बल ६.३ किलो सोने घातले होते. या सोन्याचे मूल्य सुमारे १० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. गळ्यात जाडजूड सोन्याच्या साखळ्या, हातात कडे आणि गळ्याभोवती सोन्याच्या माळा अशा या पाहुण्याच्या रूपाने मंडपातील भाविक थक्क झाले.
प्रेम कुमार सिंह कोण आहेत?
हे ‘गोल्डन मॅन’ म्हणजे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील बासदेवपूर येथील रहिवासी प्रेम कुमार सिंह. ते शेती करतात आणि सरकारी कंत्राटदार म्हणूनही काम करतात. सोने खरेदी करणे आणि ते अंगावर घालून मिरवणे, हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यामुळेच त्यांची ओळख ‘गोल्ड मॅन ऑफ बिहार’ अशी झाली आहे. त्यांच्याकडे सोन्याच्या अनेक साखळ्या, अंगठ्या, कडे आणि हनुमानाचे एक खास लॉकेट आहे. तसेच २४ कॅरेट सोन्याचा मुलामा दिलेली बुलेट मोटारसायकलही त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते.
सतरा वर्षांपासून सोन्याचा छंद
प्रेम कुमार सिंह यांना गेल्या सतरा वर्षांपासून सोने खरेदी करण्याचा छंद लागला आहे. तिशीच्या वयात त्यांनी सोने खरेदीला सुरुवात केली आणि गळ्यात सोन्याची साखळी घालून सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या अंगावरील सोन्याचे प्रमाण वाढत गेले. आज त्यांच्याकडे सोन्याच्या ३८ साखळ्या, १० अंगठ्या आणि हातात ३ सोन्याची कडे आहेत. कथेच्या वेळी त्यांच्यासोबत छायाचित्रे आणि सेल्फी काढण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
दरम्यान, काही भाविकांनी या प्रकारावर नाराजीही व्यक्त केली. धार्मिक कार्यक्रमात श्रीमंतीचे असे प्रदर्शन कशासाठी, असा सवाल काहींनी उपस्थित केला. कथा ऐकण्यासाठी आले होते की सोन्याचे प्रदर्शन करण्यासाठी, अशी कुजबुज मंडपात ऐकू येत होती.
Leave a Reply