खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी आता ती टप्प्याटप्प्याने काढण्याची सुविधा मिळू शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (एसडब्ल्यूपी) या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे.
१९ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या २४० व्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. सध्या कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर आपल्या पीएफ खात्यात जमा असलेली रक्कम एकरकमी काढू शकतात. मात्र नव्या सुविधेमुळे संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याची गरज राहणार नाही.
नवीन सुविधा कशी असेल?
नव्या योजनेत कर्मचारी आपल्या गरजेनुसार दर महिन्याला, तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी ठरावीक रक्कम काढू शकतील. विशेष म्हणजे, खात्यात शिल्लक राहिलेल्या पैशांवर व्याज मिळत राहणार आहे. निवृत्तीनंतर अनेकांना नियमित उत्पन्नाची गरज असते. अशा वेळी पीएफमधील संपूर्ण रक्कम एकदम खर्च होण्याऐवजी ती खात्यात ठेवून गरजेनुसार पैसे काढता येतील. यामुळे निवृत्तीनंतरच्या खर्चाचे नियोजन करणे सोपे होऊ शकते. काही रक्कम एकदम काढून उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये घेण्याचाही पर्याय मिळू शकतो. तसेच केवळ व्याजाची रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
५० लाखांच्या निधीवर किती मिळू शकते?
ईपीएफओच्या अंदाजानुसार, ५० लाख रुपयांच्या निवृत्ती निधीवर वेगवेगळ्या पर्यायांमध्ये मिळणारी रक्कम वेगळी असू शकते. बँकेच्या मुदत ठेवीत ७ टक्के व्याजदराने दरमहा सुमारे ३२,४९२ रुपये मिळू शकतात. कमर्शियल अॅन्युइटीमध्ये ६ टक्के दराने सुमारे ३०,६३७ रुपये मिळू शकतात. तर ईपीएफ एसडब्ल्यूपीमध्ये ८ टक्के दर गृहीत धरल्यास दरमहा सुमारे ४१,८२२ रुपये मिळू शकतात. मात्र, हे आकडे केवळ अंदाज आहेत. प्रत्यक्ष मिळणारी रक्कम व्याजदर आणि योजनेच्या अंतिम नियमांवर अवलंबून असेल. त्यामुळे निवृत्तीनंतर पीएफमधून नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरू शकते.
Leave a Reply