ठाणे जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांनी केली आहे. शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले आहे.
भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण या पाचही तालुक्यांतील ग्रामीण भागात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे भातशेतीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ठाणे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले असले, तरी जिल्ह्याचा जवळपास ५० ते ६० टक्के भाग आजही ग्रामीण आहे. अनेक गावांमधील नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे केवळ जिल्ह्याचे शहरी स्वरूप विचारात घेऊन त्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश न करणे हे ग्रामीण शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरू शकते, असे चौघुले यांनी निवेदनात म्हटले आहे.
पंचनामे आणि सर्वेक्षणाची मागणी
पाचही तालुक्यांतील शेतीच्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे आणि वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे, अशी मागणी आमदार चौघुले यांनी केली आहे. भातशेतीसह अन्य पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याबाबत विशेष निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
ज्या शेतकऱ्यांची भातशेती पूर्णपणे वाया गेल्याने त्यांनी पीक काढून टाकले आहे, अशा शेतकऱ्यांनाही मदतीपासून वंचित ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय पीकविमा, कृषी विभागाच्या विविध योजना आणि आपत्ती निवारणाच्या निकषांनुसार बाधित शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Leave a Reply