नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत सुरगाणा तालुक्यातील अकरा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव केला. नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
गौरव करण्यात आलेल्यांमध्ये गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब खेडकर, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ आणि माधव गावित, राशाचे सरपंच सीताराम भोये, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर वाघेरे, बुबळीचे सरपंच मनोहर राऊत, ग्रामविकास अधिकारी गणेश गावित, स्वच्छता अभियानाचे तालुका समन्वयक योगेश महाले आणि गृहनिर्माण अभियंता पल्लवी चौधरी यांचा समावेश आहे.
शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम
गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांनी आदिवासी भागात मिशन नवोदय आणि सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून अहमदाबाद येथील विज्ञान प्रयोगशाळेच्या भेटीसाठी विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवून आणला. त्याचबरोबर भाभा संशोधन केंद्रास विद्यार्थी भेट, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान, शिष्यवृत्ती परीक्षा आणि इंग्रजी भाषेतील स्पेलिंग बी स्पर्धा असे वैविध्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
दुर्गम भागातही सेवेचा ध्यास
सुरगाणासारख्या अतिदुर्गम तालुक्यात शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे, विकासकामांना गती देणे आणि नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवणे यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असतात. या सोहळ्याच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि इतरांनाही प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
पुरस्कार हा केवळ व्यक्तीचा सन्मान नसून त्यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याचा, सामाजिक बांधिलकीचा आणि जनसेवेच्या भावनेचा गौरव असतो, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी काढले.
Leave a Reply