दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आणखी सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे त्या भागांतील शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी आज सहा तालुक्यांना दुष्काळ यादीत घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्या तालुक्यांचा समावेश?
नव्या यादीत विक्रमगड आणि दिंडोरी या तालुक्यांचा समावेश आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील एका आणि पालघर जिल्ह्यातील दोन तालुक्यांबाबतही निर्णय झाला आहे. हातकणंगले तालुक्याचा समावेश करण्याची मागणी अशोकराव माने यांनी वारंवार लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर हातकणंगले तालुकाही दुष्काळ यादीत घेण्यात आला. गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करण्याची मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली होती. ती मागणी तपासून मुख्यमंत्र्यांनी गडहिंग्लज तालुक्याचाही समावेश करण्यास मान्यता दिली.
आता ३१० तालुके दुष्काळग्रस्त यादीत
यापूर्वी ३०४ तालुके दुष्काळग्रस्त यादीत होते. नव्या सहा तालुक्यांच्या समावेशानंतर ही संख्या ३१० वर पोहोचली आहे. आणखी १३ तालुके दुष्काळ यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्या मागण्यांची तपासणी सरकार करणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या निर्णयासाठी हसन मुश्रीफ यांनीही प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराबाबतही बावनकुळे यांनी भूमिका मांडली. दादरला चैत्यभूमी हे नाव देण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी समाजाची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
Leave a Reply