दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाण्यासाठी प्रवाशांनी एसटी बसला मोठी पसंती दिली. त्यामुळे पुण्याच्या शिवाजीनगर आगाराच्या वाहतुकीत विक्रमी वाढ झाली. पाच नोव्हेंबरला आगाराने एका दिवसात तब्बल ७० हजार १९२ किलोमीटर अंतर कापले. राज्यातील एसटी आगारांमध्ये एका दिवसात नोंदवलेले हे सर्वाधिक अंतर ठरले आहे. या दिवशी आगाराला प्रवासी वाहतुकीतून ४९ लाख ४७ हजार ९९८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
सलग सहा दिवस विक्रमी धाव
शिवाजीनगर आगारातून दररोज साधारण ६० ते ६३ हजार किलोमीटर अंतर बसच्या माध्यमातून कापले जाते. मात्र दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्याने बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. परिणामी नेहमीच्या तुलनेत सुमारे सात ते दहा हजार किलोमीटर अधिक अंतर बसनी पार केले. दिवाळीच्या काळात शिवाजीनगर आगाराने सलग सहा दिवस ६६ हजार ते ७० हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापले. एक नोव्हेंबरला ६६ हजार ३८४, दोन नोव्हेंबरला ६६ हजार, तीन नोव्हेंबरला ७० हजार १८४, चार नोव्हेंबरला ६६ हजार ६७१, तर पाच नोव्हेंबरला ७० हजार १९२ किलोमीटरची नोंद झाली. सहा नोव्हेंबरला ६७ हजार ६४ किलोमीटर अंतर बसनी पार केले.
लांब पल्ल्याच्या बस आणि आगाराची व्यवस्था
शिवाजीनगर आगारातून लालपरीसह शिवशाही, शिवनेरी, हिरकणी, जनशिवनेरी आणि शयनयान अशा विविध प्रकारच्या बस प्रवाशांच्या सेवेत होत्या. आगारातून दररोज सकाळी सात वाजता इंदूरसाठी बस सोडली जाते. शिवाजीनगर ते इंदूर हे सुमारे ६८० किलोमीटरचे अंतर असून आगारातून धावणारी ही सर्वांत लांब पल्ल्याची बस आहे. याशिवाय अमरावती, अकोला, नागपूर, धुळे आणि यवतमाळ या शहरांसाठीही लांब पल्ल्याच्या बस सोडण्यात येतात. आगारात एकूण ११५ बस मुक्कामी असतात. याबाबत शिवाजीनगरचे वरिष्ठ आगारप्रमुख संजय वाळवे म्हणाले, शिवाजीनगर आगारातून दररोज साधारण ६० ते ६३ हजार किलोमीटरचा प्रवास होतो. दिवाळीदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे पाच नोव्हेंबरला ७० हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास झाला. आजपर्यंतची ही राज्यातील सर्वाधिक किलोमीटरची नोंद आहे.
Leave a Reply