न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारतीय संघाने ३-१ अशा फरकाने आपल्या नावे केली. मालिकेतील शेवटचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. भारताने न्यूझीलंडसमोर केवळ २१० धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य सहज पार होईल, असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा आणि उत्तम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामना २२ धावांनी जिंकला. मात्र हा विजय साजरा होत असतानाच संघाला एक मोठा धक्का बसला. ठरलेल्या वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय संघावर कारवाई केली आहे.
सात षटके कमी, ३५ टक्के दंड
अंतिम सामन्यात भारतीय संघ निर्धारित षटकांच्या गतीपेक्षा तब्बल सात षटके मागे राहिला होता. या कारणामुळे परिषदेने संघावर ३५ टक्के दंड आकारला आहे. खेळाडू आणि खेळाडूंना साहाय्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. नियमानुसार, ठरलेल्या वेळेत प्रत्येक षटक कमी पडल्यास खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून पाच टक्के रक्कम दंड म्हणून वजा केली जाते. सात षटके कमी पडल्याने एकूण दंड ३५ टक्क्यांवर पोहोचला.
कर्णधाराने मान्य केली चूक
शेवटच्या सामन्याचा कर्णधार श्रेयस अय्यर याने ही चूक मान्य केली आहे. सामना पंच रंजन मदुगले यांनी सुचवलेली शिक्षा त्याने विनाअट स्वीकारली असल्याचे समजते. मालिका जिंकल्याचा आनंद असतानाही या कारवाईमुळे संघाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गोलंदाजांनी शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत आणत विजय मिळवून दिला होता, पण षटकांची गती राखण्यात संघ कमी पडला आणि त्याची किंमत दंडाच्या रूपात मोजावी लागली आहे.
Leave a Reply