व्यवसाय उभा करायचा म्हटला की मोठं शहर, भरपूर भांडवल आणि मोठं कार्यालय असायलाच हवं, असं सहसा मानलं जातं. पण बिहारमधील एका गावात राहणाऱ्या तरुणाने या समजुतीला छेद दिला आहे. घरात बसून सुरू केलेल्या ऑनलाइन व्यवसायाची उलाढाल त्याने अवघ्या काही वर्षांत दोन कोटी रुपयांच्या घरात नेली आहे.
लहानपणापासूनच व्यवसायाची आवड
नवादा जिल्ह्यातील गावात राहणारे अम्मार महमूद यांना लहानपणापासूनच व्यवसायाची आवड होती. त्यांचे वडील व्यवसाय करत असल्यामुळे माल पुरवठादारांपासून ग्राहकांपर्यंतचा संपूर्ण व्यवहार त्यांनी लहानपणीच जवळून पाहिला होता. त्यामुळे व्यवसाय कसा चालतो, ग्राहकांशी कसं बोलायचं आणि मालाची विक्री कशी करायची, याचा अंदाज त्यांना आधीच होता.
पुढे इंटरनेटवर ऑनलाइन विक्रीविषयी माहिती घेताना त्यांना या क्षेत्राची आवड निर्माण झाली. बीबीएचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी वडिलांच्या व्यवसायातही मदत सुरू ठेवली होती. शिक्षण आणि व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव या दोन्हींची जोड त्यांच्या पुढील वाटचालीत कामी आली.
फ्लिपकार्टपासून स्वतःच्या कंपनीपर्यंत
2019 मध्ये अम्मार यांनी स्वतःचा प्रकल्प सुरू करून फ्लिपकार्टवर उत्पादनांची विक्री करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2022 मध्ये वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी आयकिट्झिल इंक या कंपनीची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी टॉर्च आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीवर लक्ष केंद्रित केलं होतं.
व्यवसाय वाढवताना पॅकेजिंग, मालाची वाहतूक आणि ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्यात अनेक अडचणी आल्या. या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी वॉलमार्ट वृद्धी कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा घेतला. योग्य उत्पादन निवडणं, वस्तूंची गुणवत्ता सुधारणं आणि ग्राहकांचा विश्वास जिंकणं यावर त्यांनी भर दिला.
विक्रीचा आलेख चढता राहिला
याचा परिणाम त्यांच्या व्यवसायाच्या आकडेवारीतही दिसून आला. 2022 मध्ये त्यांची विक्री साधारण 6 ते 8 लाख रुपये होती. 2023 मध्ये हा आकडा 75 लाख रुपयांवर पोहोचला. तर 2024 मध्ये त्यांच्या व्यवसायाची उलाढाल 2 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली.
आज अम्मार नवादा येथील आपल्या घरातूनच अवघ्या पाच जणांच्या टीमसोबत हा व्यवसाय सांभाळतात. त्यांच्या उत्पादनांची विक्री देशभरात केली जाते. मोठं शहर किंवा मोठं कार्यालय नसतानाही नियोजन, दर्जा आणि ग्राहकांचा विश्वास या बळावर व्यवसाय उभा राहू शकतो, हे त्यांच्या प्रवासातून दिसून येतं.
Leave a Reply