खेळाच्या मैदानावर घडलेली एक दुर्दैवी घटना संपूर्ण फुटबॉल विश्वाला हादरवून गेली आहे. अर्जेंटिनामध्ये एका सामन्यादरम्यान चेंडू डोक्याला लागल्याने अवघ्या १८ वर्षांच्या तरुण खेळाडूचा जीव गेला. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी घडली. अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्सजवळील जोस सी. पाज परिसरात हा सामना खेळवला जात होता. एफसी एजीजा आणि डेपोर्टिव्हो मुनिज या दोन्ही संघांच्या युवा संघांमध्ये हा सामना सुरू होता. मैदानात खेळ वेगाने आणि उत्साहात सुरू होता. त्याच वेळी विरोधी संघातील एका खेळाडूने चेंडू दूर पाठवण्यासाठी संपूर्ण ताकद लावून जोरदार फटका मारला. चेंडू फार दूर गेला नाही, पण प्रचंड वेगाने तो १८ वर्षीय एबेल नुनेज याच्या डोक्याला जाऊन लागला. समोर आलेल्या दृश्यात विरोधी खेळाडूचा पायही त्याच्या डोक्याला लागताना दिसत आहे.
## मैदानातच कोसळला, उपचारानंतरही जीव वाचला नाही
ही धडक इतकी जोरदार होती की तरुण खेळाडू स्वतःला सावरू शकला नाही. चेंडू लागताच त्याला भोवळ आली आणि तो मैदानातच खाली कोसळला. तो बेशुद्ध पडला होता. तो कोसळताच त्याच्या संघातील खेळाडूंनी त्याच्याभोवती गराडा घातला. डॉक्टरांनीही मैदानात येऊन त्याची काळजी घेतली. सामना थांबवण्यात आला. त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. मात्र वेळ निघून गेली होती. खेळाडूंनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चेंडू एवढ्या प्रचंड वेगाने आला होता की त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. डोक्याचे हाड मोडले आणि डोक्यात रक्तस्राव सुरू झाला. एबेलचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. सर्व प्रयत्न करूनही त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही संघांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
## खेळाडूंच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्न
या घटनेने जगभरातील फुटबॉल चाहत्यांना धक्का बसला आहे. खेळाच्या मैदानावरील खेळाडूंची सुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मैदानात खेळाडूला गंभीर दुखापत झाल्यास तातडीने कोणती मदत उपलब्ध असते, हा मुद्दा या घटनेनंतर पुन्हा चर्चेत आला आहे.
Leave a Reply