जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी चिन्हवाटप करण्यात आले. यंदा महायुतीचे सहकार पॅनल आणि काँग्रेस-शेतकरी संघटनेचे शेतकरी पॅनल यांच्यात थेट लढत होणार आहे. एकूण २१ पैकी १२ जागा माघारीच्या वेळी बिनविरोध झाल्या असून आता नऊ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत.
मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी माघारीचा शेवटचा दिवस होता. त्याअखेर १२ उमेदवार बिनविरोध झाले. बिनविरोध झालेल्या उमेदवारांमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह काही दिग्गजांचा समावेश आहे.
महायुतीचा प्रयत्न, तरीही लढत
या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची महायुती झाली आहे. संपूर्ण निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले; मात्र तसे होऊ शकले नाही. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. त्या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्याची उमेदवारी कायम राहिली आहे. चाळीसगावातही आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात उमेदवारी कायम आहे. अन्य सात जागांवरही इतर उमेदवार रिंगणात असल्याने नऊ जागांवरील लढतींमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
तालुकानिहाय उमेदवार आणि चिन्हे
यावलमधून प्रशांत चौधरी यांना ट्रॅक्टर, गणेश नेहते यांना नारळ, रामदास पाटील यांना छत्री आणि विनोदकुमार पाटील यांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. रावेरमधून राजेंद्र चौधरी यांना कपबशी, योगीराज पाटील यांना ट्रॅक्टर आणि महेश पाटील यांना शिट्टी हे चिन्ह देण्यात आले आहे. चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांना कपबशी, नारायण पाटील यांना एअर कंडिशनर आणि विजय पाटील यांना पोळपाट लाटणे हे चिन्ह मिळाले आहे. मुक्ताईनगरात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना कपबशी आणि देवयानी देशमुख यांना ऑटो रिक्षा हे चिन्ह मिळाले आहे. महिला प्रतिनिधींमध्ये माधुरी अत्तरदे यांना कपबशी, ज्योती पाटील यांना ट्रॅक्टर, पूनम पाटील यांना कपबशी आणि सुलोचना पाटील यांना ट्रॅक्टर हे चिन्ह मिळाले आहे. इतर मागासवर्गीय प्रतिनिधींमध्ये सुनील देवरे यांना ट्रॅक्टर, अनिल पाटील यांना बॅट, कुलभूषण पाटील यांना चष्मा आणि चंद्रकांत बाविस्कर यांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.
Leave a Reply