शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या एकूण ११ हजार ४८१ जागांपैकी ११ हजार ४३१ जागांवर प्रवेश झाले असून, ही टक्केवारी ९९.५६ इतकी आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झाली आहे.
नऊ फेऱ्यांतून प्रवेश प्रक्रिया पूर्ण
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यंदा एमबीबीएस आणि बीडीएस या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी एकूण नऊ फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन, रिक्त जागांच्या तीन आणि विशेष रिक्त जागांच्या तीन फेऱ्यांचा समावेश होता. या सर्व फेऱ्यांमधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नऊ फेऱ्यांनंतरही एमबीबीएसच्या ३० आणि बीडीएसच्या २० अशा एकूण ५० जागा रिक्त राहिल्या. हे सर्व प्रवेश खासगी महाविद्यालयांचे असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.
एमबीबीएस आणि बीडीएसची आकडेवारी
राज्यातील ७१ वैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये एमबीबीएसच्या एकूण ८ हजार ८६४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ८ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, त्यामुळे या अभ्यासक्रमाची प्रवेश टक्केवारी ९९.६६ झाली आहे. यामध्ये ४३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व ५ हजार ६५ जागांवर प्रवेश झाले आहेत. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील ३ हजार ३४९ जागांपैकी ३ हजार ३२९, तर दोन खासगी वैद्यकीय विद्यापीठांतील ४५० जागांपैकी ४४० जागांवर प्रवेश निश्चित झाले. बीडीएस अभ्यासक्रमाच्या राज्यातील २९ महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये २ हजार ६१७ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशाची टक्केवारी ९९.२३ आहे. पाच शासकीय दंत महाविद्यालयांमधील सर्व ३१७ जागांवर प्रवेश झाले आहेत. खासगी महाविद्यालयांतील २ हजार २०० जागांपैकी २ हजार १९९, तर खासगी विद्यापीठातील १०० जागांपैकी ८१ जागांवर प्रवेश झाले आहेत.
नियमांतील बदलामुळे प्रक्रिया सीईटी कक्षामार्फत
यापूर्वी नियमित प्रवेशाच्या फेऱ्यांनंतर शिल्लक राहिलेल्या जागा संस्था स्तरावर भरल्या जात होत्या. मात्र, यंदा वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रवेश नियमांत बदल करून सर्व फेऱ्यांमधील प्रवेश सीईटी कक्षामार्फत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सहा नियमित फेऱ्यांनंतरही शिल्लक राहिलेल्या जागांसाठी वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वेळापत्रकानुसार तीन विशेष फेऱ्या घेण्यात आल्या.
Leave a Reply