त्र्यंबकेश्वर शहरातून भूमिगत वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रावरील सिमेंट काँक्रिटचा स्लॅब काढून त्याऐवजी आता ‘प्री कास्ट बॉक्स’ बसविण्यात येणार आहेत. हे बॉक्स गरज पडल्यास काढता येतील, त्यानंतर नदीपात्र स्वच्छ करता येईल आणि पुन्हा तेच बॉक्स बसविता येतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये चौथ्यांदा स्लॅब काढण्याची ही कारवाई होत आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनपथ टप्पा दोनअंतर्गत एमएसआयडीसीमार्फत विविध कामांना गती दिली जात आहे. यात तेली गल्ली येथील नीलगंगा ते गायत्री मंदिरापर्यंत साधारणतः ३०० मीटर अंतरावरील सिमेंट काँक्रिट काढण्यात येत आहे. सिमेंटऐवजी या ठिकाणी अडीच मीटर खोल आणि सहा मीटर रुंदीचे प्री कास्ट ब्लॉक बसविण्यात येतील. ब्लॉक काढल्यानंतर नदीपात्र स्वच्छ करता येईल. सुरक्षेसाठी पुन्हा हे ब्लॉक बसविण्यात येणार आहेत, जेणेकरून गोदावरी कायमस्वरूपी प्रवाही राहील. पुढील तीन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
कुंभमेळ्यातील स्नानासाठी नियोजन
गोदावरी नदी कायमस्वरूपी प्रवाहित ठेवण्याचे प्रयत्न या कामातून केले जात आहेत. नदी प्रवाहित राहिल्यास तिचे पाणी नवीन कुशावर्तापर्यंत पोहोचेल आणि भाविकांना कुंभमेळ्यात स्नानाचा आनंद घेता येईल. तीर्थराज कुशावर्त तीर्थावर सध्या मर्यादित भाविकांनाच स्नान करता येते. हजारो भाविक एकाच वेळी स्नान करतील, या दृष्टीने पेगलवाडी येथील नवीन घाटांवरील नियोजन करण्यात येत आहे. त्याच दृष्टीने दर्शनपथ टप्पा दोनअंतर्गत त्र्यंबकेश्वर शहरातील मुख्य रस्त्यावरील सिमेंट काँक्रिट काढण्याचे काम जलदगतीने सुरू झाले आहे.
स्लॅबचा इतिहास आणि रथोत्सवाची मागणी
गोदावरी नदीपात्रावरील स्लॅबचा इतिहास जुना आहे. १९५६ मध्ये प्रथमच स्लॅब टाकण्यात आला. १९९१-९२ मध्ये दुसऱ्यांदा बदल करून पाइप व स्लॅब बसवण्यात आले. २००३-०४ मध्ये तिसऱ्यांदा चॅनल व स्लॅब करण्यात आले. आता २०२६-२७ मध्ये चौथ्यांदा सिमेंट काँक्रिट काढून प्री कास्ट बॉक्स बसवण्यात येत आहेत.
दरम्यान, येत्या २४ तारखेला त्र्यंबकेश्वर पौर्णिमा रथोत्सव आहे. यंदा रथोत्सवासाठी श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांचा रथ आणावा आणि रथोत्सव साजरा करावा, अशी मागणी वजा सूचना नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वरमधील गंगा स्लॅबच्या कामामुळे भाविक रस्त्यावर, म्हणजे स्लॅबवर थांबू शकणार नाहीत. अशा गर्दीत भव्य लाकडी रथ मिरवणे अवघड होणार असल्याची चर्चा आहे. यावर काहींनी रथाची पूजा करून रथ लक्ष्मीनारायण चौकापर्यंत आणावा, तिथून माघारी न्यावा आणि रथातील देव पालखीने कुशावर्त तीर्थावर न्यावे, असे सांगितले. काही भाविकांनी त्र्यंबकेश्वराच्या रथाची पूजा करावी; परंतु प्रत्यक्षात श्री संत निवृत्तिनाथ महाराजांचा चांदीचा रथ आणून यात त्र्यंबकेश्वराची मूर्ती मिरवावी, अशी मागणी केली. त्र्यंबकेश्वर रथ ओढण्यासाठी तीन-चार बैलजोड्यांची गरज पडते, तर संत निवृत्तिनाथांचा रथ केवळ एक बैलजोडी ओढेल, असेही सांगण्यात येत आहे.
Leave a Reply