नगर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून त्यांच्या हल्ल्यांच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारूळवाडी, बुऱ्हाणनगर, कापूरवाडी, शेंडी, पोखर्डी आणि नगर शहरातील गजराजनगर परिसरात गेल्या आठ दिवसांत चार ते पाच बिबट्यांचे दर्शन झाले आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याबाबत कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणी आमदार अक्षय कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आगामी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नावर निर्णयासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंजरे पुरेसे नाहीत; स्थलांतराची मागणी
बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांना घराबाहेर पडतानाही भीती वाटू लागली आहे. शेतकरी, नागरिक आणि रात्री घरी परतणाऱ्या ग्रामस्थांना बिबट्यांचे दर्शन होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कर्डिले यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. केवळ पिंजरे लावून प्रश्न सुटणार नाही, संबंधित परिसरातील बिबट्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव यापूर्वीही मांडण्यात आला होता, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे नसबंदीबाबत कायदेशीर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे कर्डिले यांनी स्पष्ट केले. वन विभागाने नागरिकांना रात्री एकट्याने बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, शेतात जाताना सतर्क राहावे आणि बिबट्या दिसल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.
Leave a Reply