केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून भारतीय डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या वतीने ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
चेहरा ओळखीची नवी सुविधा
या मोहिमेत बायोमेट्रिक पडताळणीसोबतच आता चेहरा ओळख (फेस ऑथेंटिकेशन) ही नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या पेन्शनधारकांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत, त्यांना या सुविधेचा मोठा दिलासा मिळणार आहे. बारामती, इंदापूर, सासवड, दौंड आणि शिरूर तालुक्यांतील सर्व ग्रामीण टपाल कार्यालये, उपटपाल कार्यालये तसेच बारामती मुख्य डाकघरात ही सेवा मिळणार आहे.
केवळ ७० रुपयांत घरबसल्या दाखला
केवळ ७० रुपये शुल्क आकारून पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवकाला घरी बोलावून अथवा जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येईल. यासाठी आधार क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन टपाल कार्यालयाचे अधीक्षक (बारामती विभाग) केतन शित्रे, शाखा प्रबंधक स्वप्नील सावंत आणि क्लार्क अंजन यांनी केले आहे. याबाबतची माहिती सासवड उपविभागाचे डाक निरीक्षक योगेश वीर यांनी दिली.
Leave a Reply