गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

फलटण हेरिटेज हाफ मॅरेथॉन १३ डिसेंबरला; तीन गटांत स्पर्धा

फलटणमध्ये १३ डिसेंबरला हेरिटेज हाफ मॅरेथॉन होणार आहे. पाच, १० व २१ किलोमीटर अशा तीन गटांत स्पर्धा होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

फलटण हेरिटेज हाफ मॅरेथॉन १३ डिसेंबरला; तीन गटांत स्पर्धा

फलटणमध्ये १३ डिसेंबरला हेरिटेज हाफ मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. फलटण रनर्स फाउंडेशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली असून, फलटण शहरातील सजाई गार्डन ते गिरवी रोड या मार्गावर धावपटू धावणार आहेत. पाच किलोमीटरची फन रन, १० किलोमीटर आणि २१ किलोमीटर अशा तीन गटांत धावपटूंना सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम मुदत २० नोव्हेंबरपर्यंत आहे.

फलटण शहराचा ऐतिहासिक वारसा समाजासमोर आणणे, नागरिकांत व्यायामाचे महत्त्व रुजविणे आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती करणे हा या मॅरेथॉनमागील प्रमुख उद्देश आहे. पाच किलोमीटरची फन रन खुल्या गटासाठी आयोजित केली आहे. तर, १० व २१ किलोमीटरच्या स्पर्धांसाठी १८ ते ३४ वर्षे, ३५ ते ४९ वर्षे आणि ५० वर्षे व त्यापुढील असे वयोगट निश्चित केले आहेत. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत.

विजेत्यांना रोख पारितोषिके

दहा व २१ किलोमीटरच्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या धावपटूंना अनुक्रमे १० हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये रोख पारितोषिकांसह पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला सहभाग पदक, टी-शर्ट, बॅग आणि वेलकम किट दिले जाईल.

फलटण शहरासह विविध भागांतील धावपटूंनी स्पर्धेत सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश द्यावा, असे आवाहन फलटण रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले आहे. यावेळी नानासाहेब काळुखे, प्रवीण घोरपडे, अनुजा त्रिपुटे, अमित माने, डॉ. चंद्रकांत जगदाळे, चंद्रकांत सापते, अभिजित शेंडे आणि पराग मासाळ यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance