दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठं नाव असलेले कमल हासन त्यांच्या चित्रपटांइतकेच वैयक्तिक आयुष्यामुळेही सातत्यानं चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या पहिल्या लग्न आणि घटस्फोटाभोवतीची चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे. पहिली पत्नी वाणी गणपती यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर आपली आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाल्याचं त्यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं. पोटगी आणि घटस्फोटाच्या आर्थिक तडजोडीमुळे आपलं बँक खातं शून्यावर गेल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र त्यांच्या या म्हणण्यावर वाणी गणपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
कमल हासन नेमकं काय म्हणाले होते?
2015 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत कमल हासन यांनी पहिल्या घटस्फोटानंतरच्या काळाबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी ते अभिनेत्री सारिका यांच्यासोबतच्या नात्याविषयी आणि मुलगी श्रुती हासन यांच्या जन्मानंतरच्या परिस्थितीविषयी बोलत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, वाणी गणपती यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर द्याव्या लागलेल्या पोटगीमुळे त्यांच्याकडील सर्व पैसे संपले होते. शून्य बँक बॅलन्ससह त्यांना नव्यानं आयुष्य सुरू करावं लागलं होतं. त्यानंतर मुलगी श्रुतीसोबत त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं होतं. मात्र त्यावेळी चित्रपट कारकीर्द चांगली सुरू असल्यामुळे ते आर्थिक अडचणीतून लवकर बाहेर पडू शकले, असंही त्यांनी सांगितलं होतं.
वाणी गणपती यांचं सडेतोड उत्तर
कमल हासन यांच्या या विधानानंतर वाणी गणपती यांनी एका मुलाखतीत त्यांच्यावर टीका केली होती. घटस्फोटानंतर पोटगी द्यावी लागल्यामुळे एखादी व्यक्ती कंगाल होऊ शकते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. न्यायालय एवढी मोठी रक्कम देण्याचा आदेश देतं का की ज्यामुळे महिलेला आयुष्यभर आर्थिक सुरक्षितता मिळेल, असंही त्यांनी विचारलं होतं. कमल हासन यांनी घटस्फोटानंतर भाड्याच्या घरात राहावं लागल्याचं सांगितलं होतं. मात्र वाणी यांच्या मते, लग्नाच्या संपूर्ण काळात ते दोघंही भाड्याच्या घरातच राहत होते. काही काळ ते कमल यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या घरातही राहिले होते. त्यामुळे घटस्फोटानंतर आलिशान घर सोडून भाड्याच्या घरात जावं लागल्याचं चित्र उभं करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
वाणी गणपती यांनी कमल हासन यांच्या विधानावर संताप व्यक्त करताना ते मुलगी श्रुती हासन यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. स्वतःला त्याग करणारे वडील म्हणून दाखवण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केल्याची टीकाही वाणी यांनी केली होती. त्यांचं हे वागणं अत्यंत बालिश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर कमल हासन स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली होती. चित्रपट असो किंवा वैयक्तिक आयुष्य, प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरण्याची त्यांची सवय असल्याचं वाणी यांनी म्हटलं होतं.
कमल हासन आणि वाणी गणपती यांनी 1978 मध्ये लग्न केलं होतं. जवळपास दहा वर्षांच्या संसारानंतर 1988 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर कमल हासन यांनी अभिनेत्री सारिका यांच्याशी लग्न केलं. या दोघांना श्रुती आणि अक्षरा हासन या दोन मुली आहेत. 2004 मध्ये कमल आणि सारिका यांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर कमल हासन अभिनेत्री गौतमी यांच्यासोबत जवळपास 13 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. 2016 मध्ये त्यांचेही मार्ग वेगळे झाले.
Leave a Reply