मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखोंची कमाई केली, तर ती कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. मध्य प्रदेशातील अनिल सोनावणे यांची कहाणी अशीच आहे. एकेकाळी रोजंदारीवर काम करणारे अनिल आज चाट आणि नमकीनच्या व्यवसायातून चांगली कमाई करत आहेत.
मजुरीच्या कामातून मिळणाऱ्या पैशातून घरखर्च भागवणे आणि उद्याची चिंता करणे, हेच त्यांचे रोजचे जगणे होते. मोठे स्वप्न पूर्ण करणे या परिस्थितीत कठीण वाटत होते. रोजच्या मजुरीला कंटाळून ते अस्वस्थ झाले होते. त्यांना कायमस्वरूपी आणि ठराविक काम हवे होते. याच काळात एका मित्राने त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला. ही कल्पना त्यांना पटली आणि त्यांनी चाटची गाडी लावून छोटा व्यवसाय सुरू केला.
## छोट्या ठेल्यापासून सुरुवात
सुरुवातीला मोठे दुकान किंवा मोठी गुंतवणूक करण्याऐवजी त्यांनी हातात असलेल्या मर्यादित साधनांमधूनच चाट आणि नमकीनचा ठेला सुरू केला. ग्राहकांचा विश्वास जिंकणे आणि व्यवसाय वाढवणे हे सुरुवातीला सोपे नव्हते. मात्र त्यांनी चव आणि कामाच्या दर्जाला प्राधान्य दिले. मेहनत आणि सातत्य सोडले नाही. हळूहळू त्यांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळू लागला.
## १५ वर्षांची मेहनत, २५ लाखांची कमाई
तब्बल १५ वर्षे हा व्यवसाय टिकवून ठेवत त्यांनी जवळपास २५ लाख रुपये कमावले. या कमाईतून त्यांनी स्वतःची स्वप्ने पूर्ण केली आणि मुलांना उत्तम शिक्षण दिले. अनिल यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे, त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळेच कमाईचा काही भाग ते मुलांच्या शिक्षणासाठी देतात.
मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे भांडवल, मोठे दुकान आणि आधुनिक सुविधा हव्या असतात, असे अनेकांना वाटते. पण अनिल यांचा प्रवास सांगतो की व्यवसायाची सुरुवात नेहमीच मोठी असावी असे नाही. छोट्या ठेल्यापासूनही मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते.
Leave a Reply