नाशिक : शहरातील झाडांचे संरक्षण आणि नंदिनी नदीच्या स्वच्छतेबाबत नाशिक महापालिकेच्या कामकाजावर माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तराने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. झाडांवर अनधिकृत जाहिरात फलक, खिळे, लोखंडी पट्ट्या आणि विद्युत रोषणाई लावणाऱ्यांवर केलेली कारवाई तसेच नंदिनी नदी स्वच्छतेवर झालेला खर्च या दोन्ही बाबींची माहिती मागविली असता, महापालिकेच्या सातपूर विभागातील वृक्ष प्राधिकरण विभागाने ‘निरंक’ असे उत्तर दिले आहे.
माहिती अधिकारातून काय विचारले?
निसर्गसेवक युवा मंचचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल केला होता. गेल्या वर्षभरात झाडांवर अनधिकृत जाहिरात फलक लावणे, खिळे ठोकणे, लोखंडी पट्ट्या बसविणे आणि विद्युत रोषणाई करण्याच्या प्रकारांमध्ये किती नोटिसा बजावल्या व किती दंड वसूल केला, अशी विचारणा करण्यात आली होती. त्यावर उद्यान निरीक्षक तथा जनमाहिती अधिकारी यांनी दिलेल्या उत्तरात कारवाईचा तपशील ‘निरंक’ असल्याचे नमूद केले. याच अर्जात नंदिनी नदी स्वच्छतेसाठी गेल्या वर्षभरात झालेल्या खर्चाची माहितीही मागविण्यात आली होती. त्यालाही ‘निरंक’ असे उत्तर मिळाल्याने नदी स्वच्छतेच्या कामांवर नेमका किती निधी खर्च झाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खर्चाचा हिशेब जाहीर करण्याची मागणी
झाडांचे नुकसान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अनधिकृत फलक व रोषणाई हटवावी, तसेच नंदिनी नदी स्वच्छतेसाठी मंजूर निधी, खर्च, कामांची बिले आणि प्रत्यक्ष कामांचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. पर्यावरणप्रेमींकडून कारवाई आणि खर्चाचा हिशेब जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Leave a Reply