जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी लश्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भट याला एन्काउंटरमध्ये ठार केलं आहे. सीआरपीएफच्या चौकीवर झालेल्या हल्ल्यात भट सहभागी होता. आज पहाटे दक्षिण काश्मीरमधील देवसर परिसरातील जांगलपोरा येथे ही कारवाई झाली. भट मशिदीत लपला होता. मशिदीतून बाहेर पडताच सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि तो जागीच ठार झाला.
या कारवाईनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोशल मीडियावर एका ओळीची पोस्ट करत फरार दहशतवाद्यांना सूचक इशारा दिला आहे. ‘तुम्ही पळून जाऊ शकता, पण लपू शकत नाही,’ असं पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
११ नोव्हेंबरच्या हल्ल्यात तीन जवान शहीद
११ नोव्हेंबर रोजी भट आणि उमर निसार डार यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली होती. सोमवारी दक्षिण काश्मीरमधील लारू बायपास परिसरात झालेल्या चकमकीत डार ठार झाला होता. ११ नोव्हेंबरच्या हल्ल्यात सामील असलेल्यांपैकी डार एक होता.
गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने जांगलपोरा परिसरात झाडाझडती सुरू केली होती. भटला घेराव घातल्यानंतर त्याला शरणागती पत्करण्याची संधीही देण्यात आली होती, मात्र त्याने ती नाकारली. तो मशिदीत लपला असल्याने जवानांनी आत न जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या बाहेर येण्याची वाट पाहत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. काही वेळाने भट बाहेर आल्यावर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.
डारने भटला सहा महिने आश्रय दिला होता
डारने भटला सुमारे सहा महिने लपण्यासाठी आश्रय दिला होता आणि त्याला आवश्यक सुविधा पुरवल्या होत्या. काही दिवसांपूर्वी दोघांनी मिळून सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता, त्यापूर्वी त्यांनी रेकीही केली होती. डार हा पूर्वी ब्रेड बनवण्याचं काम करत होता. तो हरवल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी दिली होती, मात्र तो पाकिस्तानातील लश्कर-ए-तोयबाशी संबंधित द रजिस्टेंस फ्रंटमध्ये सामील झाला होता. सोमवारी तो चकमकीत ठार झाला आणि त्यापाठोपाठ आज भटही मारला गेला.
सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेद्र प्रताप सिंह यांनीही या कारवाईनंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ‘सहकाऱ्यांनो अभिनंदन. काही पदार्थ कडकडत्या थंडीतच वाढणं चांगलं असतं,’ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
Leave a Reply