रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाबाबत विचारलेल्या प्रश्नावर गीतकार जावेद अख्तर यांनी दिलेल्या उत्तरामुळे नवा वाद उभा राहिला आहे. एका कार्यक्रमात त्यांना या चित्रपटाबद्दल मत विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी चित्रपट अद्याप पाहिलेला नसल्याचं सांगितलं, मात्र तो पाहण्याची इच्छा असल्याचंही नमूद केलं.
राम हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून एक आदर्श आणि जगण्याचा मार्ग असल्याचं मत अख्तर यांनी मांडलं. धर्म कोणताही असो, भारतातील प्रत्येकाच्या रक्तात राम आहेत, असंही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे मौलाना साजिद रशीदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मौलानांचा सल्ला काय?
रशीदी यांनी अख्तर यांच्यावर टीका करताना त्यांचं कुटुंब हे व्यावसायिक कुटुंब असल्याचं म्हटलं. बॉलिवूडमध्ये त्यांची गाणी विकली जातात आणि अशी वक्तव्यं केली नाहीत तर त्यांची गाणी कोण विकत घेणार, असा सवाल त्यांनी केला. अख्तर यांनी अनेकदा सार्वजनिकपणे स्वतःला नास्तिक असल्याचं सांगितल्याचा दाखलाही रशीदी यांनी दिला.
जे नास्तिक आहेत, त्यांनी रामावर एवढी श्रद्धा दाखवली तर त्यांनी घरवापसी करावी आणि आपलं नाव जावेद अख्तरऐवजी ‘रामपाल’ ठेवावं, असा सल्ला रशीदी यांनी दिला. असं केल्यास किमान ८० टक्के हिंदू त्यांना पूर्ण मान-सन्मान देतील, असं त्यांचं म्हणणं आहे. अख्तर हे सध्या कुंपणावर बसले असून त्यांनी एका बाजूला यावं, असंही रशीदी म्हणाले. कैफी आझमी हेही गाणी लिहायचे, मात्र त्यांनी पैशासाठी आपला इमान कधी विकला नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
अख्तर यांचं धर्माबद्दलचं मत
अख्तर यांनी यापूर्वी धर्माबद्दल बोलताना धार्मिक लोकांचा आदर करत असल्याचं सांगितलं होतं. मुस्लिम कुटुंबात जन्म झाल्याचं आणि तसेच संस्कार झाल्याचं सांगून तरुण वयात आपण नास्तिक झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. धर्माच्या नावाखाली ट्रोलिंग झाल्यावर आपल्याला हसू येतं, असंही ते म्हणाले होते. अनेकजण आपल्याला ‘जिहादी’ म्हणतात, तर काहीजण पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देतात; मात्र या गोष्टींकडे आपण विनोद म्हणून पाहतो, असं त्यांचं म्हणणं आहे.
Leave a Reply