महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या संख्येत आणखी एका महापालिकेची भर पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसराला स्वतंत्र नागरी प्रशासन मिळण्याच्या हालचालींना वेग आला आहे. वाळूज महानगर आणि सिडको महानगर परिसरासह आसपासच्या गावांचा समावेश करून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने माहिती संकलन सुरू केले आहे.
१२ ग्रामपंचायतींचा समावेश
या प्रस्तावित क्षेत्रात वडगाव कोल्हाटी, तिसगाव, शाहजापूर, पंढरपूर, करोडी, रांजणगाव शे.पू., वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी, अनंतपूर, आंबेलोहळ आणि तुर्काबाद खराडी या १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी ऑक्टोबरमध्ये वाळूज महानगरलगतच्या या १२ ग्रामपंचायतींच्या हद्दी, लोकसंख्या आणि अन्य आवश्यक तपशील संकलित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद आणि तहसील कार्यालयांकडून माहिती जमा करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मंगळवारी (दि. १७) प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदींनुसार नगरपरिषद स्थापनेसाठी आवश्यक निकषांची पूर्तता होते का, याची तपासणी केली जात आहे.
प्रस्ताव कधी पाठवला जाणार
मार्चनंतर जनगणनेची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर लोकसंख्येच्या निकषानुसार नवीन नगरपरिषद किंवा ‘क’ वर्गाची महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. वाळूज परिसराच्या नागरीकरणाच्या दिशेने यापूर्वीच एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे — वाळूज महानगरसाठी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. औद्योगिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरी सुविधांची गरज लक्षात घेता स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे वाळूज परिसराला नेमके कोणते नागरी प्रशासन मिळणार, याचे चित्र पुढील टप्प्यात स्पष्ट होणार आहे.
Leave a Reply