महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. हे वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
लेखी परीक्षेच्या तारखा
जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून ती गुरुवार, १८ मार्च २०२७ पर्यंत चालेल. यामध्ये सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा समावेश आहे. तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ रोजी सुरू होऊन सोमवार, १५ मार्च २०२७ रोजी संपेल.
प्रात्यक्षिक व विशेष तरतुदी
लेखी परीक्षेपूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षांच्या तारखाही मंडळाने निश्चित केल्या आहेत. इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होतील. यामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे. संगणकांची मर्यादित संख्या लक्षात घेता या दोन्ही विषयांच्या ऑनलाइन परीक्षा महाविद्यालयांनी गटागटाने व दोन सत्रांत आयोजित कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडतील. यामध्ये शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे.
बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांची जेईई परीक्षा येत असेल, अशा विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच कालावधीत अन्य दिवशी आयोजित करावी, अशा स्पष्ट सूचना मंडळाने दिल्या आहेत. तसेच वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणांमुळे जे विद्यार्थी नियमित कालावधीत प्रात्यक्षिक वा तोंडी परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी लेखी परीक्षेनंतर ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा घेतली जाईल. बारावीसाठी ही परीक्षा १२, १३ व १५ मार्च २०२७ रोजी, तर दहावीसाठी १६ ते १८ मार्च २०२७ दरम्यान होईल.
इयत्ता दहावीतील नियमित व पुनर्परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कार्यशिक्षण विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा मंगळवार, १६ मार्च २०२७ ते शनिवार, २७ मार्च २०२७ या कालावधीत दुपारच्या सत्रात शालेय स्तरावर घेण्यात येईल. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थी संख्येनुसार प्रात्यक्षिक परीक्षांचे अचूक नियोजन करावे आणि परीक्षेचा दिनांक व वेळ याची माहिती विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी वेळेवर द्यावी, जेणेकरून कोणीही परीक्षेपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.
Leave a Reply