ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात मंगळवारी पहाटे एका बंगल्यावर दरोडा पडला. घरातील अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मात्र या घटनेनंतर नावातील साधर्म्यामुळे काही काळ मोठा गोंधळ उडाला होता.
दिवा शहरातील आगासनगाव परिसरात स्थानिक उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांचा बंगला आहे. पहाटेच्या वेळी चोरट्यांनी बंगल्यात शिरून दरोडा घातला. ही वार्ता समोर येताच एकच खळबळ उडाली.
नावातील साधर्म्यामुळे गोंधळ
उद्योजक तुकाराम मुंडे यांचे नाव सनदी अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नावाशी जुळते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्याच घरी चोरी झाली की काय, असा समज पसरला. ही बातमी समाजमाध्यमांवर वेगाने पसरली आणि उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. आपल्या परिसरात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या घरी दरोडा पडल्याचे आपल्याला कसे कळले नाही, असा प्रश्नही अनेकांना पडला. मात्र पोलिसांनी माहिती दिल्यानंतर खरा प्रकार समोर आला. दरोडा अधिकाऱ्यांच्या घरी नव्हे, तर उद्योजक तुकाराम मुंडे यांच्या घरी पडल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांचा तपास सुरू
दरोड्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
Leave a Reply