इंधन, वीज आणि बिगर-खाद्य वस्तूंच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईचा दर वाढून १२.२९ टक्क्यांवर पोहोचला आहे. आधार वर्ष २०२२-२३ असलेल्या नव्या घाऊक मूल्य निर्देशांक मालिकेतील हा आतापर्यंतचा उच्चांकी दर असून, तब्बल ३६ महिन्यांत घाऊक महागाईने हा उंच टप्पा गाठला आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये हा दर ११.३९ टक्के होता.
ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई वाढून ८.२६ टक्क्यांवर पोहोचली. सप्टेंबरमध्ये ती ८.१४ टक्के होती. बिगर-खाद्य वस्तूंची महागाई ११.६९ टक्के नोंदवली गेली, तर सप्टेंबरमध्ये ती १०.२८ टक्के होती. खनिजांच्या किमती वाढण्याचा दरही सप्टेंबरमधील ९.५१ टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये १२.६४ टक्क्यांवर गेला. किरकोळ महागाई ६.०९ टक्क्यांवर नोंदवली गेली आहे.
इंधन आणि विजेच्या महागाईत मोठी वाढ
इंधन आणि विजेच्या महागाईत मोठी वाढ झाली असून, ऑक्टोबरमध्ये हा दर ३२.८४ टक्क्यांवर गेला. सप्टेंबरमध्ये तो २५.८५ टक्के होता. दुसरीकडे, उत्पादित वस्तूंची महागाई सप्टेंबरमधील ९.७६ टक्क्यांवरून किंचित घसरून ९.५४ टक्क्यांवर आली. ऑगस्टपासून घाऊक महागाईचा दर वेगाने वाढत असून तो सलग दुहेरी आकड्यात कायम आहे. मात्र, घाऊक किमतीचा किरकोळ बाजारातील किमतीवर होणारा परिणाम मर्यादित असल्याचे बार्कलेजने म्हटले आहे.
महागाई वाढीमागची कारणे
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमधील घाऊक महागाई वाढण्यामागे खनिज तेल, पेट्रोलियम उत्पादने, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, वीज, खाद्यपदार्थ आणि मूलभूत धातूच्या किमतीतील वाढ ही प्रमुख कारणे आहेत. याशिवाय रसायने, रासायनिक उत्पादने, खाद्यपदार्थांचे उत्पादन, कापड उद्योग तसेच रबर आणि प्लास्टिक उत्पादनांच्या किमतींनीही महागाईत भर घातली.
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ देवेंद्र पंत यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई नव्या मालिकेतील उच्चांकी स्तरावर पोहोचली असून, यामागे आधारभूत परिणामासोबतच प्राथमिक वस्तू आणि इंधन व वीज क्षेत्रातील व्यापक दरवाढ कारणीभूत आहे. पश्चिम आशियातील दीर्घकाळ सुरू असलेल्या संकटामुळे इंधन आणि विजेची महागाई वाढत असून, या संकटावर तोडगा निघेपर्यंत महागाईचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर ऊर्जा किमतींमधील नरमाईमुळे नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई कमी होण्यास मदत होईल, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.
Leave a Reply