अनेक जोडपी लग्नापूर्वी बराच काळ एकत्र असतात. या काळात एकमेकांचा स्वभाव, आवडीनिवडी आणि वागणूक समजून घेण्याची संधी मिळते. मात्र लग्नानंतर काही काळाने नात्यातील पूर्वीचा प्रेमळपणा आणि जवळीक कमी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागतात आणि नात्यात असुरक्षितताही वाढते. अशा वेळी आपले नाते नेमके किती मजबूत आहे, हे समजून घेणे गरजेचे असते.
नात्यात प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा टिकून आहे की नाही, हे तपासण्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारून पाहता येतात. या प्रश्नांची उत्तरे वैवाहिक नात्याची ताकद ओळखण्यास मदत करतात.
आदर आणि विश्वास
पहिला प्रश्न एकमेकांबद्दलच्या आदराबद्दल आहे. जोडीदार कितीही कामात व्यस्त असला, तरी तो आदराने आणि प्रेमाने वागतो का, याचा विचार करा. तुमच्या भावना, मते आणि निर्णयांना तो महत्त्व देतो का, हे स्वतःला विचारा. तुम्हालाही त्याच्याबद्दल आदर वाटतो का, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. दोघांकडूनही आदर राखला जात असेल, तर नात्याचा पाया मजबूत असल्याचे हे लक्षण आहे.
दुसरा प्रश्न विश्वासाबद्दल आहे. प्रेम असो किंवा लग्न, कोणतेही नाते टिकवण्यासाठी विश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. तुमचा जोडीदारावर पूर्ण विश्वास आहे का आणि तो प्रामाणिक राहतो, अशी खात्री तुम्हाला वाटते का, हे स्वतःला विचारा. विश्वास असेल, तर नात्यात विनाकारण संशय किंवा असुरक्षितता निर्माण होत नाही. विश्वास कमी होत असेल, तर संवाद साधून तो पुन्हा निर्माण करण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अडचणीत साथ आणि जवळीक
तिसरा प्रश्न साथ देण्याबद्दल आहे. जोडीदार नेहमी प्रेम व्यक्त करत नसेल, तरी प्रत्येक अडचणीच्या वेळी तो पाठीशी खंबीरपणे उभा राहतो का, हे पाहा. तुमच्या समस्या समजून घेणे, महत्त्वाच्या निर्णयांमध्ये साथ देणे आणि इतरांसमोर तुमची बाजू समजून घेणे, यातून नात्यातील समजूतदारपणा दिसतो. दोघेही गरजेच्या वेळी एकमेकांना साथ देत असतील, तर नाते भावनिकदृष्ट्या मजबूत असल्याचे म्हणता येईल.
चौथा प्रश्न जवळीकेबद्दल आहे. कितीही भांडण झाले किंवा मतभेद निर्माण झाले, तरी एकमेकांशी बोलल्याशिवाय राहवत नसेल, तर नात्यातील भावनिक जवळीक दिसून येते. रागाच्या भरात काही वेळ दूर राहावेसे वाटले, तरी पुन्हा बोलून वाद मिटवण्याची इच्छा असणे महत्त्वाचे आहे. एकमेकांची काळजी वाटणे आणि नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करणे, हे नात्यातील प्रेम आणि बांधिलकी दर्शवते.
Leave a Reply