सातपुड्याच्या दुर्गम भागात बोलली जाणारी देहवाली भिली भाषा आणि इतर स्थानिक आदिवासी बोलीभाषांना आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भाषांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. १७) नंदुरबारात भेट दिली.
लोय गावात प्रत्यक्ष पाहणी
शिष्टमंडळाने नंदुरबार तालुक्यातील लोय गावाला भेट देऊन एआय तंत्रज्ञानाच्या आधारे देहवाली बोलीभाषेवर काम करीत असलेल्या विविध तज्ज्ञांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. अमेरिकेतील धर्मादाय लेदिर फाउंडेशन आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था कार्या यांच्या संयुक्त विद्यमाने ही दाता भेट आयोजित केली होती.
शिष्टमंडळात कोण कोण होते
या दौऱ्यात लेदिर फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ब्रायन लोनर्गन, कॅरोल किर्चनर यांच्यासह कार्या संस्थेचे संस्थापक मनू चोप्रा आणि ऐना आसिफ यांनी भाग घेतला. शिष्टमंडळाने लोय गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून देहवाली भिली भाषेतील डेटा संकलन आणि डिजिटल तंत्रज्ञानात या भाषेचा वापर कसा केला जात आहे, याची प्रत्यक्ष पाहणी केली.
स्वतःच्या भाषेत तंत्रज्ञानाचा लाभ
आदिवासी समाजाच्या समृद्ध बोलीभाषा केवळ संवादापुरत्या मर्यादित न राहता, जगातील आधुनिक एआय प्रणालींमध्ये त्यांचा समावेश व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्याच भाषेत तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल आणि त्यातून त्यांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. लेदिर फाउंडेशनचे मुख्य कार्यालय अमेरिकेतील वाशिंग्टनच्या सिएटल येथे असून, ही संस्था जागतिक स्तरावर गरिबी निर्मूलन आणि एआय तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापरासाठी कार्यरत आहे. आदिवासी भागात बोलीभाषांच्या विकासासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
भेटीमुळे कामाला गती मिळण्याचा विश्वास
या भेटीदरम्यान आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे मुख्य संयोजक भिमसिंग वळवी, नीति आयोगाच्या जिल्हा समन्वयक वैष्णवी रामडोहकर आणि कार्या संस्थेचे जिल्हा समन्वयक कमलेश महाले यांनी जिल्ह्यातील या प्रकल्पाची सविस्तर माहिती शिष्टमंडळाला दिली. भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक संतोष वळवी, अंकित वळवी, शुभांगी वळवी, प्रफुल्ल वसावे, गौतम वळवी, रोशनी पाडवी आणि वंदना पाडवी यांनी सहकार्य केले. या आंतरराष्ट्रीय भेटीमुळे नंदुरबारमधील आदिवासी बोलीभाषांच्या संवर्धनाच्या कामाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
Leave a Reply