नाशिक पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी थकवलेल्या पाणी वापर संस्थांना यंदा सिंचनासाठी पाणी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कालवा यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज सादर केले तरी ते मंजूर केले जाणार नाहीत. विभागाच्या लाभक्षेत्रातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन उन्हाळी हंगामाच्या सिंचनाचे नियोजन करण्यात आले असून, याबाबत कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी सूचना दिल्या आहेत.
उन्हाळी सिंचनाचे नियोजन
गंगापूर, गोदावरी, आळंदी, पालखेड आणि कडवा या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. उपलब्ध साठ्याला प्राधान्य देत प्रथम मंजूर असलेल्या उन्हाळी बारमाही पिकांना पाणी दिले जाईल. त्यानंतर नवीन बारमाही पिकांच्या लागवडीसाठी परवानगी देण्याचे नियोजन आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत संबंधित सिंचन शाखा कार्यालयात पाणी मागणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
धरणांतील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरविण्याचे उद्दिष्ट असल्याने पाणी वापर संस्थांसह शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन विभागाने केले आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींनीही पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सिंचनासाठी अर्जासोबत चालू वर्षाचा वैध सातबारा उतारा जोडणे आवश्यक आहे. ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करावा, असेही सांगण्यात आले आहे. नियमानुसार पाणीपट्टी आकारणी करण्यात येणार असून, ऊस पिकासाठी स्वतंत्र पाणीपट्टी व अन्य आवश्यक अटी लागू राहतील.
Leave a Reply