सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या कामामुळे माजलगाव बँकवॉटरवरून येणारी मुख्य पाइपलाइन हलवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे बीड शहरातील तब्बल ७० टक्के भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे. आधीच पंधरा दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मिळणारे पाणी आता या तीन दिवसांच्या नव्या तांत्रिक व्यत्ययामुळे थेट अठरा दिवसांवर ढकलले गेले आहे. परिणामी, ऐन हिवाळ्यात बीडकरांच्या घशाला कोरड पडली असून पाण्यासाठी त्यांची मोठी फरफट होत आहे.
१९ नोव्हेंबरपर्यंत पाणी नाही; कोणत्या भागांना फटका
बीड शहराच्या बाहेरून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पूर्वी सर्व्हिस रोड देण्यात आलेला नव्हता. मात्र, आता नव्याने या सर्व्हिस रोडचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रस्ते बांधणीच्या कामात माजलगाव बँकवॉटरवरून बीड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन मोठी अडचण ठरत होती. ही पाइपलाइन सुरक्षित ठिकाणी हलवणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आवश्यक असल्याने प्रशासनाने हे काम हाती घेतले आहे. या कामामुळे माजलगाव बँकवॉटरवर अवलंबून असलेल्या बीड शहराच्या ७० टक्के भागाला १९ नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही. या पाणीकपातीचा सर्वाधिक फटका स्वराज्य नगर, शिवाजी नगर, शाहू नगर, गया नगर, शिंदे नगर, आदर्श नगर, अंबिका चौक, राजीव गांधी चौक, संत नामदेव नगर, अंकुश नगर, पालव चौक, जिजाऊ नगर, पंचशील नगर, कृषी कॉलनी, नगर नाका, मित्र नगर, विद्या नगर, बार्शी नाका, राष्ट्रवादी भवन परिसर, वन विभाग कार्यालय परिसर आणि बलभीम चौक या प्रमुख वस्त्यांना बसणार आहे. या सर्व भागांमधील पाण्याचे नियमित चक्र आता तीन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे. मुख्य पाइपलाइन हलवण्याच्या या कामादरम्यानच पाणीपुरवठा विभागाने गळती काढण्याचे कामही हाती घेतले आहे. देवडी शिवारातील तीन आणि जवळा तांड्याच्या अलीकडील एक अशा एकूण चार मोठ्या गळती दुरुस्त करण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे.
अनधिकृत बोअर आणि नागरिकांचा संताप
सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताजवळ ५०० मीटरच्या आत खासगी बोअरवेल घेण्यास शासनाचे आणि प्रशासनाचे कडक प्रतिबंध आहेत. असे असतानाही, बीड शहरात सध्या विनापरवानगी अनधिकृत बोअर मारण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. प्रशासनाच्या आदेशाला डावलून सुरू असलेल्या या प्रकारामुळे भूजल पातळी झपाट्याने खालावण्याचा आणि भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा खंडित करताना पालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे. शाहू नगर येथील गृहिणी सीमा जाधव यांनी आधीच पंधरा दिवसांनी पाणी यायचे, आता अठरा दिवस झाले, अशी खंत व्यक्त केली. गया नगरचे रमेश महानोर म्हणाले की, रस्त्याच्या कामासाठी पाइपलाइन हलवणे समजू शकते, पण प्रशासनाने पर्यायी पाणीपुरवठ्याची काहीतरी सोय करायला हवी होती. दुसरीकडे, पाणीपुरवठा विभागाचे इंजिनिअर प्रमोद माने यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या कामामुळे पाइपलाइन हलवणे अत्यंत गरजेचे असल्यानेच हे काम हाती घेण्यात आले आहे. यासोबतच मुख्य पाइपलाइनवरील चार मोठ्या गळतीही काढल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.
Leave a Reply