हिवाळ्याच्या दिवसांत गरमागरम सूप प्यायल्याने शरीराला उब मिळते आणि जेवणाची चवही वाढते. कोथिंबीर क्रीम सूप हे असेच एक चविष्ट आणि आरोग्यदायी सूप आहे. ते घरच्या घरी रेस्टॉरंटसारखे चविष्ट बनवता येते. कोथिंबिरीचा ताजा सुगंध, दुधाची मऊसर चव आणि फ्रेश क्रीमची क्रीमी झाक यामुळे हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.
साहित्य
कोथिंबीर क्रीम सूप बनवण्यासाठी एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर, एक कप दूध, दोन चमचे फ्रेश क्रीम, एक छोटा कांदा, दोन पाकळ्या लसूण, एक चमचा बटर, चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि दोन कप पाणी घ्या.
कृती
सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर तिचे बारीक तुकडे करा. कांदा आणि लसूणदेखील बारीक चिरून घ्या. यामुळे सूप बनवताना सर्व साहित्य व्यवस्थित शिजेल. आता एका पॅनमध्ये बटर गरम करा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घालून हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यामुळे सूपला छान सुगंध आणि चव येईल. त्यानंतर पॅनमध्ये चिरलेली कोथिंबीर घाला. त्यामध्ये थोडे पाणी टाकून दोन ते तीन मिनिटे शिजवा. कोथिंबीर मऊ झाल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. थंड झालेले कोथिंबिरीचे मिश्रण मिक्सरमध्ये घाला आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा. सूप अधिक मऊ आणि छान बनवण्यासाठी ही पेस्ट गाळून घेऊ शकता. आता एका पॅनमध्ये तयार केलेली पेस्ट घाला. त्यामध्ये दूध, मीठ आणि काळी मिरी टाकून चांगले मिसळा. मंद आचेवर काही मिनिटे गरम करा. त्यानंतर त्यामध्ये फ्रेश क्रीम घालून पुन्हा एकदा ढवळून घ्या. तयार झालेले कोथिंबीर क्रीम सूप एका बाऊलमध्ये काढा. वरून थोडे फ्रेश क्रीम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम सूप ब्रेड क्रुटॉन्स किंवा टोस्टसोबत सर्व्ह करा.
Leave a Reply