अभिनेत्री म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर लेखिका म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ट्विंकल खन्ना यांनी महाकाव्यातील रावणाची एक वेगळ्याच अंगाने तुलना केली आहे. एका वर्तमानपत्रातील स्तंभात त्यांनी रावणाला आजच्या काळातील तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य व्यक्तींशी जोडले असून, त्याला ‘मूळ तंत्रज्ञानवीर’ असे संबोधले आहे.
ट्विंकल यांनी आपल्या लेखात रावणाची तुलना जगातील काही सर्वांत शक्तिशाली तंत्रज्ञान उद्योजकांशी केली आहे. यामध्ये जेन्सन हुआंग, इलॉन मस्क आणि बिल गेट्स यांचा समावेश आहे. रावणाची असामान्य बुद्धिमत्ता, त्याच्याकडे असलेली अफाट संपत्ती, त्याची तांत्रिक क्षमता आणि इतरांना लागू होणारे नियम आपल्याला लागू होत नाहीत, ही त्याची मानसिकता यांत त्यांना आजच्या तंत्रज्ञान विश्वातील व्यक्तींशी साम्य दिसते.
पुष्पक विमान आणि टेस्ला रोडस्टरची तुलना
नितेश तिवारी दिग्दर्शित आगामी दोन भागांच्या ‘रामायण: राइज ऑफ अ लेजेंड’ या चित्रपटातील रावणाच्या व्यक्तिरेखेवर भाष्य करताना ट्विंकल यांनी ही तुलना मांडली आहे. चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार असून, त्याच्या टेस्ला रोडस्टरशी रावणाच्या पौराणिक उडत्या रथाची, म्हणजेच पुष्पक विमानाची तुलना त्यांनी केली आहे.
रावण अत्यंत विद्वान, श्रीमंत आणि शक्तिशाली होता. त्याच्याकडे उल्लेखनीय तंत्रज्ञान उपलब्ध होते. इतरांना लागू होणारे नियम आपल्यापेक्षा खालचे आहेत, असे त्याला वाटत असे. यामध्ये अमरत्वाचा ध्यास जोडला, तर त्याच्यातील आणि आजच्या तंत्रज्ञान अब्जाधीशांमधील साम्य दुर्लक्षित करणे कठीण आहे, असे त्यांनी लेखात म्हटले आहे.
रावण सिलिकॉन व्हॅलीत कसा दिसला असता?
रावण आजच्या तंत्रज्ञान विश्वात किती सहजपणे मिसळून गेला असता, याची कल्पनाही ट्विंकल यांनी केली आहे. त्यांच्या मते रावणाला फक्त एक लेदर जॅकेट, त्याच्या दहाही डोक्यांवर एक-एक गॅझेट आणि स्वतःचा पॉडकास्ट, तसेच सिलिकॉन व्हॅलीमध्ये एक मुख्यालय हवे आहे. तिथे तो अगदी सहज मिसळून जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
रावणाकडे जग जिंकण्याची बुद्धिमत्ता आणि क्षमता होती. मात्र अनेक शक्तिशाली पुरुषांप्रमाणेच तो स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरला, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे. त्यांच्या या तुलनेत बिल गेट्स यांच्यासह इतर प्रभावशाली व्यावसायिक व्यक्तींभोवती असलेल्या वादांचा आणि टीकेचाही संदर्भ आहे. अफाट संपत्ती, बुद्धिमत्ता आणि तांत्रिक प्रगती म्हणजे व्यक्तीच्या वैयक्तिक निवडींवर नियंत्रण असणे नव्हे, हा त्यांच्या लेखाचा मुख्य गाभा आहे.
दरम्यान, नमित मल्होत्रा निर्मित हा दोन भागांचा चित्रपट भारतीय महाकाव्यावर आधारित आहे. यात रणबीर कपूर श्रीराम, साई पल्लवी सीता, रवी दुबे लक्ष्मण आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटातील एक पोस्ट-क्रेडिट सीन आणि ‘हनुमान चालीसा’ असलेला एक म्युझिक व्हिडिओ देखील प्रदर्शित केला आहे. या भक्तिगीतात सनी देओलची भगवान हनुमानाच्या रूपातील झलक पाहायला मिळते.
Leave a Reply