जळगाव : शेतकऱ्यांनाच आपल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई-पीक पाहणी उपक्रम सुरू आहे. पण अद्याप पिकपेरा लागवड ई-पीक पाहणीद्वारे होत नसल्याची स्थिती आहे. खरिपात या पीक पाहणीस कमी प्रतिसाद मिळाला. रब्बीत मात्र प्रतिसाद चांगला राहील, असे दिसत आहे. त्यात तलाठ्यांना ऑफलाइन पीक पेऱ्याचे अधिकार दिले जावेत, अशी मागणी केली जात आहे.
पेरा नोंदवता येत नाही
सध्या केळी, मका, कलिंगड, कांदा, ज्वारी, हरभरा, गहू पेरणी व लागवड सुरू आहे. पूर्वहंगामी पीक लागवड पूर्ण झाली आहे. परंतु या लागवडीच्या नोंदी ऑनलाइन किंवा सातबाऱ्यावर दिसत नसल्याची स्थिती आहे. अद्ययावत प्रकारातील अँड्रॉइड मोबाईलच्या मदतीने ई-पीक पाहणी अॅपवरून नोंद करावी लागते. रब्बी हंगामातील पीक पेऱ्यांबाबत अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे. परंतु ही नोंदणी करता येत नाही. शेतकरी पीक कर्ज व अन्य बाबींसाठी पिकपेरा लावलेला सातबारा उतारा देऊ शकत नाहीत.
तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी अडचणीत
नोंदणीसाठी नेटवर्क आणि डाटा हवा असतो. स्मार्टफोन अनेकांकडे नाहीत. यामुळे पेरा नोंदणीस कमी प्रतिसाद मिळतो. या स्थितीत पीक पाहणी तलाठ्यांना करून देण्याचे अधिकार दिले जावेत, अशी मागणी कायम आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये अॅप डाऊनलोड केले आहे. अॅप सांकेतांक नोंदणी केल्यावरही कार्यरत होत नाही, अशा तक्रारी आहेत. शेतकरी याबाबत तांत्रिक समस्या घेऊन तलाठी कार्यालयात जात आहेत. परंतु तलाठी याबाबत दुरुस्ती किंवा इतर कार्यवाहीबाबत असमर्थता दाखवीत आहेत.
Leave a Reply