पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून सात महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० हजार ७१३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर सुमारे ८९ कोटी २४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्यांमध्ये दुचाकीचालक सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
इंटरसेप्टर वाहने कशी काम करतात
राज्य परिवहन विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जरब बसवण्यासाठी ६९ इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली होती. या वाहनांवर अत्याधुनिक रडार यंत्रणा बसवण्यात आली असून, त्याच्या हाताळणीचे प्रशिक्षण २०० मोटार वाहन निरीक्षक तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षकांना देण्यात आले होते. त्यातील नऊ रडार यंत्रणा असलेली इंटरसेप्टर वाहने पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. आरटीओच्या वायूवेग पथकांकडून मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, पुणे-बंगळुरू आणि पुणे-नाशिक महामार्गांवर तसेच शहरातील अपघातप्रवण मार्गांवर कारवाई केली जात आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.
नव्या इंटरसेप्टर वाहनांमध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन आहे. वाहनांच्या छतावर किंवा मागे बसवलेले अत्याधुनिक रडार कॅमेरे सुमारे ३०० मीटर ते १.५ किलोमीटर अंतरावरून वेगाने जाणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र आणि व्हिडिओ टिपू शकतात. वाहनात ई-चलन यंत्रासह अन्य सुविधा असून, मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अॅनलायझर यंत्रणाही उपलब्ध आहे.
कोणत्या नियमांचे उल्लंघन सर्वाधिक
कारवाई झालेल्या वाहनांमध्ये हेल्मेट न घालणारे २,२७७, अवैध इन्शुरन्स असलेले २,३७८, रिफ्लेक्टर नसलेले ९१६, सिटबेल्ट न लावणारे ६८६, मोबाईल फोन वापरणारे ३८०, सिग्नल मोडणारे १९४ आणि अवैध प्रवासी वाहतूक करणारे ३ चालक आहेत. इतर नियमभंगांखाली ३,८७९ जणांवर कारवाई झाली असून एकूण संख्या १०,७१३ इतकी आहे. आरटीओच्या ताफ्यात नऊ अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेली इंटरसेप्टर वाहने असून २० अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे.
Leave a Reply