परभणी शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सलग चौथ्या दिवशीही शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर सकाळपासूनच वाहनांच्या लांब रांगा लागल्या. बेशिस्त वाहनचालक, अस्ताव्यस्त पार्किंग आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे रस्त्यांवर अक्षरशः गोंधळाचे वातावरण होते. वाहतुकीचा हा बोजवारा उडालेला असताना वाहतूक शाखा आणि महापालिका प्रशासन मात्र ठोस उपाययोजना करताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अतिक्रमणांचा विळखा आणि राजकीय दबाव
वाहतूक शाखेचे ढिसाळ नियोजन हे कोंडीमागील प्रमुख कारण असले, तरी रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत वाढलेल्या अतिक्रमणांचा विळखाही तितकाच जबाबदार आहे. रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने, हातगाड्या आणि व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे अरुंद रस्त्यांवरून वाहनांना मार्ग काढणेही कठीण झाले आहे. मात्र, अतिक्रमणांवर कारवाईची वेळ आली की महापालिका प्रशासनाची भूमिका मवाळ होते. अतिक्रमण हटाव मोहिमा केवळ कागदावरच राहतात की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील अनेक अतिक्रमणांना राजकीय वरदहस्त असल्याने अधिकारी पुढे सरसावले की त्यांना राजकीय दबावाचा सामना करावा लागतो. परिणामी, कारवाईचा धाक उरलेला नाही आणि अतिक्रमणधारकांचे फावले आहे.
सुट्यांनंतर प्रवाशांची गर्दी वाढली
दिवाळीचा सण नुकताच संपल्याने सुट्यांनंतर गावी जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. परिणामी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्याही रस्त्यांवर वाढली आहे. या परिस्थितीत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करणे, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती उलटच दिसून येत आहे.
वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा वेळ रस्त्यावरच वाया जात आहे. रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवांनाही अशा कोंडीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील रस्ते मोकळे ठेवणे, अतिक्रमणे हटविणे आणि वाहतुकीला शिस्त लावणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखविण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक शाखा आणि महापालिका प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखविण्याऐवजी संयुक्त कारवाई करून अतिक्रमणांचा विळखा दूर करावा, वाहतुकीचे नियोजन करावे आणि नागरिकांना कोंडीतून मुक्त करावे, अशी संतप्त मागणी होत आहे.
Leave a Reply